- वैद्यकीय विभागाचे आवाहन
पिंपरी – राज्य शासनाच्या सूचनेनुसार सध्या राज्यातील मुंबई, ठाणे, परभणी, बीड आणि रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये पक्षामध्ये बर्ड फ्लू आजाराचा विषाणू आढळून आलेला आहे. बीड वगळता इतर जिल्हयांमध्ये एच5एन1 हा विषाणू आढळला आहे. तर बीडमध्ये एच5एन8 हा विषाणू आढळून आला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील काही भागांमधून एक-दोन संख्येमध्ये कावळे, कबूतर, वटवाघूळ मृत झाल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पशू वैद्यकीय विभागामार्फत शहरातील पोल्ट्री व्यावसायिक तसेच घरगुती कुक्कटपालन व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींची माहिती संकलित करण्यात येत असून अशा ठिकाणी बर्ड फ्ल्यू सदृश आजाराचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
तसेच मोठ्या प्रमाणात पक्ष्यांचे मृत्यू झाल्याचे आढळून आल्यास त्याकामी वैद्यकीय विभागास अवगत करुन वैद्यकीय विभागामार्फत इतर सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
या आजारामध्ये फ्लूसारख्या आजाराचे लक्षणे आढळून येतात. प्रामुख्याने अतिजोखमीच्या व्यक्ती म्हणजेच ज्या व्यक्ती आणि त्यांचे कुटुंबे पोल्ट्री फार्म मध्ये रहात आहेत. तसेच जे कोंबड्यांची नियमित देखभाल करत आहेत अशा व्यक्तींना फ्लू सारखी लक्षणे आढळून आल्यास त्यांनी त्वरीत जवळच्या महापालिकेच्या रुग्णालय किंवा दवाखान्यामध्ये संपर्क साधावा.
तसेच पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात कावळे, पाणबगळे अथवा कोंबड्यामध्ये अनपेक्षित मृत्यू झाल्याचे आढळल्यास महापालिकेच्या पशुवैद्यकिय विभागास कळविणे. तसेच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सारथी हेल्पलाईन 8888006666 या क्रमांकावर कळविण्यात यावे असे आवाहन महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने केले आहे.