यात्रे अलंकापुरा येती । ते आवडती विठ्ठला ॥
पांडुरंगे प्रसन्नपणे । दिधले देणे हे ज्ञाना ॥
भुवैकंठ पंढरपुर । त्याहुनी थोर महिमा या ॥
निळा म्हणे जाणोनि संत । धावत येती प्रतिवर्षी ॥
ज्ञानेश्वर फड/एम. डी. पाखरे
आळंदी – श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा आणि कार्तिकी एकादशी वारी सोहळा अर्थात आळंदी यात्रेला काल (दि. 5) सुरुवात झाली. हा दैदीप्यमान सुखसोहळा अनुभवण्यासाठी देश-राज्याच्या कानाकोपर्यातून भाविक आता आळंदीत दाखल होत आहेत. हजारो भाविक आळंदीत दाखल झाले असून आळंदीतील विविध धार्मिक स्थळी भाविकांची गर्दी झाली आहे. ठिकठिकाणी हरिनाम सप्ताह सुरु आहेत. चोहिकडे हरिमानाचा गजर ऐकायला मिळतोय.
प्रदक्षिणा रस्त्यासह वडगाव रस्ता, मरकळ रस्ता, पुणे रस्ता, चाकण रस्त्यासह आळंदीतील सर्वच रस्त्यांवर विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. भाविकांची दिवसभर रस्त्यांवर वर्दळ दिसत आहे. शनिवार (दि. 9) कार्तिकी एकादशी आळंदी यात्रा, तर सोमवारी (दि. 11) श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा 727 वा संजीवन समाधी सोहळा पार पडणार आहे.
यात्रेला आलेल्या भाविकांच्या आरोग्य सेवेसाठी आळंदी ग्रामीण रुग्णालयाने जय्यत तयारी केली आहे. माऊली मंदिर, वडगांव चौक, इंद्रायणी घाट परिसर, दर्शनबारी, चाकण चौक, काळे पेट्रोलपंप, मोशी रोडवरील एमआयटी कॉलेजच्या बाहेर, चाळीस फुटी रोड, अशा विविध ठिकाणी शहरात 8 ठिकाणी आरोग्य बुथ उभारण्यात आले आहेत. सकाळी 7 वाजतापासून रात्री 9 पर्यंत या बुथवर भाविकांची तपासणी करून औषधोपचार केले जात आहेत.
डॉक्टरांचा फौजफाटा
भाविकांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी 27 विशेष वैद्यकीय तज्ज्ञ, 41 जनरल ड्युटी वैद्यकीय अधिकारी, 115 पॅरा मेडिकल स्टाफ, 32 वर्ग चारचे कर्मचारी असे मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे. विविध बुथसह ग्रामीण रुग्णालयात काल (दि. 5) 3643 रुग्णांची तपासणी करून त्यांना औषधोपचार केले तर 5 भाविकांना भरती करून उपचार केले, अशी माहिती आळंदी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नंदू वणवे यांनी दिली. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पारखे या देखील भाविकांच्या आरोग्य सेवेसाठी तैनात आहेत.
दर्शनबारी भक्तीसोपान पुलावर
माऊलींचा समाधी सोहळ्यानिमित्त भाविकांची गर्दी वाढत आहे. बुधवारी (दि. 6) दर्शनबारी इंद्रायणी घाटावरील भक्तीसोपान पुलावर गेली होती. दर्शनासाठी भाविकांना 2 ते 3 तास वेळ लागत आहे.
येथे भाविकांची लगबग
माऊलींच्या समाधी सोहळ्यानिमित्त आळंदील आलेले भाविक माऊली मंदिरासह इतर धार्मिक ठिकाणांना भेटी देत आहेत. वडगाव रस्त्यावरील योगी चांगदेव महाराज विश्रांतीवड, माऊलींनी चालविलेली भिंत, हजेरी मारुती मंदिर, भैरवनाथ मंदिर, गोपाळपूरातील गोपाळकृष्ण मंदिर, ज्ञानेश्वरी मंदिर, माऊली आणि त्यांचे कुटुंब राहत असलेले ठिकाण सिद्धबेट, मरकळ रस्त्यावरील संतीषी माता मंदिर, पद्मावती मंदिर आदि ठिकाणी देवदर्शनासाठी भाविकांची गर्दी लगबग दिसत होती.
मंदिरातील आजचे कार्यक्रम
कार्तिक वद्य दशमी, गुरुवारी (दि. 7) पहाटे 3 ते 5 पवमान अभिषेक व दुधारती, सकाळी 5 ते 11. 30 श्रींच्या चलपदुकांवर भाविकांच्या महापूजा, दुपारी 12. 30 ते 1 महानैवेद्य, सायं. 4. 30 ते 6.30 वाजता गंगुकाका शिरवळकर यांच्या तर्फे कीर्तन सेवा, सायंकाळी 6.30 ते 8. 30 वाजता वीणा मंडपामध्ये धोंडोपंत दादा अत्रे यांच्या तर्फे कीर्तन सेवा, रात्री 9 ते 11 श्रींची पालखी मंदिर प्रदक्षिणा, रात्री 9 ते 11 वासकर महाराज कीर्तन सेवा (वीणा मंडप), रात्री 11 ते 11.30 धुपारती, रात्री 11. 30 ते 12.30 हभप वाल्हेकर महाराज यांच्यातर्फे जागर.