कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी फिजिशिएनचे मार्गदर्शन मोलाचे

कोल्हापूर : कोविड केअर सेंटरवरील रुग्णांसाठी खासगी फिजिशिएनचा सल्ला व मार्गदर्शन मोलाचे ठरणार आहे. या मार्गदर्शनामुळे कोरोना रुग्णांवर उपचार करण्यास निश्चितच मदत होणार आहे. आजवर या सर्व खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी जिल्हा प्रशासनास सहकार्य केले आहे. तसेच यापुढेही असे सहकार्य करुन जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व खासगी फिजिशिएनसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, अधिष्ठाता डॉ. चंद्रकात म्हस्के, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. केम्पी-पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, डॉ. हर्षला वेदक, डॉ. अनिता सैबन्नावर उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, कोविड केअर सेंटरवरील उपचार घेत असलेल्या रुग्णांवर तेथील कार्यरत डॉक्टर उपचार करत आहेत. मात्र काही प्रसंगी रुग्ण अस्वस्थ झाल्यास त्याला केअर सेंटरमधून तातडीने पुढील उपचारासाठी संदर्भित कोविड रुग्णालयाकडे पाठविले जाते. काही वेळेला अशा रुग्णांसाठी कोविड काळजी केंद्रावरच उपचार करण्यासाठी डॉक्टरांना सल्ला व मार्गदर्शनाची आवश्यकता असते. फिजिशियननी रुग्णांची हिस्ट्री पाहून त्याबाबत सल्ला व मार्गदर्शन करावे. यामुळे मुख्य रुग्णालयावर पडणारा अतिरिक्त ताण कमी होऊन रुग्णासही मदत होईल.

माझा जिल्हा आणि मी अशी भावना ठेऊन काम करा – जिल्हाधिकारी

जिल्हाधिकारी  देसाई म्हणाले, कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यासाठी कोविड काळजी केंद्र, कोविड रुग्णालये, कोविड आरोग्य केंद्रे यांची स्थापना करण्यात आली आहे. या प्रत्येक ठिकाणी फिजिशिएनची सेवा आवश्यक आहे. कोविड काळजी केंद्रातील रुग्णांवरील उपचारासाठी मार्गदर्शन करावे. त्याबाबत सर्व फिजिशियनना केंद्रे वाटून देण्यात आली आहेत. ‘एक जिल्हा डॉक्टारांची एक संघटना, माझा जिल्हा आणि मी’ अशा भावनेतून फिजिशियननी उपचार करावेत. सर्वांनीच हातभार लावावा, असे आवाहन त्यांनी केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.