रोम – करोनाच्या धोक्यामुळे घराबाहेर जाता येत नसल्याने इटलीतील दोन मुलींनी आपापल्या इमारतींच्या टेरेसवर टेनिसचा खेळ खेळला व त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. हाच व्हिडीओ पाहून त्यांचा प्रेरणास्रोत असलेला जगातील मानांकित टेनिसपटू रॉजर फेडरर थेट इटलीत पोहोचला व या मुलीची भेट घेत त्यांच्यासह टेनिसही खेळला.
व्हिक्टोरिया व कॅरोला या अनुक्रमे 13 व 11 वर्षीय मुलींनी व्हायरल केलेल्या व्हिडीओवर चाहत्यांनीही तुफान प्रतिक्रिया दिल्या असून फेडररनेही त्यांच्यासह सेल्फी घेत त्यांच्या खेळातील कौशल्याला दाद दिली. फेडरर या दोघींच्या खेळावर इतका प्रभावित झाला की त्याने थेट इटली गाठली, या मुलींचे घर शोधून काढले, त्यांची भेटही घेतली. ज्या खेळाडूचा खेळ पाहतो त्याने प्रत्यक्ष दिलेल्या भेटीमुळे या दोघीही प्रचंड भारावल्या.
टेनिस जगतातील सर्वात बलाढ्य खेळाडू असलेल्या फेडररने या मुलींच्या आग्रहाखातर त्यांच्यासह टेनिस खेळण्याचा आनंदही लुटला. व्हिक्टोरिया आणि कॅरोला या आपल्या घराच्या टेरेसेवरून टेनिस खेळल्या याचे आश्चर्यही फेडररने व्यक्त केले.