उना (हिमाचल प्रदेश) – हिमाचल प्रदेशातील उना येथे झालेल्या भूस्खलनामुळे एका देवस्थानात चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीमध्ये दोन भाविकांचा मृत्यू झाला, तर ७ जण जखमी झाले आहेत. उना पासून ४० किलोमीटर अंतरावरील मेरी गावातील डेरा बाबा वधभांग सिंग या भक्तीस्थानामध्ये ही दुर्घटना घडली.
झपाटलेल्या व्यक्तींवर उपचार करण्यासाठी या ठिकाणी नेहमीच मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी होत असते. बाबा वधभांग सिंग येथील जत्रेमध्ये सहभागी होण्यासाठी आणि चरण गंगा येथे स्नान करण्यासाठी आज पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास शेकडो भाविक जमा झाले होते. होळी पोर्णिमेनिमित्त चरण गंगा जलाशयामध्ये स्नान करण्यासाठी हे भाविक जमा झाले होते.
तेंव्हा अचानक भूस्खलन झाले. डोंगरावरून अचानक ४-५ मोठे दगड कोसळल्यामुळे भाविकांमध्ये भीती उत्पन्न झाली आणि चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीमध्ये ९ जण जखमी झाले. जखमी झालेल्या सर्वांना सरकारी रुग्णालयामध्ये नेण्यात आले.
मात्र दोन जणांचा मृत्यू झाल्याचे नंतर जाहीर करण्यात आले. चरण गंगाजवळील स्थिती सर्वसामान्य होईपर्यंत जलाशयामध्ये स्नान करण्यास कोणालाही परवानगी दिली जाणार नाही, असे पोलिसांनी सांगितले.