लंडन – आयर्लंडमध्ये फाईन गायेल पक्षाचे नेते म्हणून ३७ वर्षीय सिमोन हॅरिस यांची निवड करण्यात आली आहे. ते पुढील महिन्यात आयर्लंडचे आतापर्यंतचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत.
आयर्लंडचे पंतप्रधान भारतीय वंशाचे लिओ वराडकर यांनी अलिकडेच पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपल्या राजीनाम्यातचे नेमके कारण स्पष्ट केले नसले, तरी वैयक्तिक आणि राजकीय अशा दोन्ही संमिश्र कारणामुळे आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले होते.
हॅरिस हे आयर्लंडमधील आघाडी सरकारचे नवीन पंतप्रधान असणार आहेत. आतापर्यंत ते या सरकारमध्ये उच्च शिक्षण मंत्री म्हणून कार्यरत होते. वराडकर यांनी राजीनामा दिल्यानंतर रुक्त झालेल्या पंतप्रधानपदासाठी हॅरिस हे एकमेव इच्छुक उमेदवार पुढे आले होते.
हॅरिस यांच्या आगोदर ४५ वर्षीय वराडकर हे आयर्लंडचे सर्वात तरुण पंतप्रधान होते. आता ती ओळख हॅरिस यांच्या नावावर जमा होणार आहे. एप्रिल महिन्याच्या पूर्वार्धात हॅरिस यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे.
फियाना फेल आणि ग्रीन पार्टी या आघाडीतील घटक पक्षांनी मिळून तयार केलेल्या विकास कार्यक्रमाची पूर्ण अंमलबजावणी करण्याची कटिबद्धता त्यांनी व्यक्त केली आहे.