नवी दिल्ली : 2024 या नव्या वर्षाची सुरुवात लवकरच होणार आहे. नववर्षापूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होण्याची शक्यता आहे. मे 2022 पासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर आहेत. वृत्तसंस्था रायटर्सच्या म्हणण्यानुसार 2024 मध्ये इंधनाच्या किमती 10 टक्के कमी होण्याची शक्यता आहे.देशात निवडणुकांचे वारे पाहता आगामी काळात केंद्र सरकार याबाबतच निर्णय जाहीर करू शकत असा अंदाज देखील वर्तवला जात आहे.
देशातील महागाई कमी करणे हे सरकारचे धोरण असल्यामुळे नवीन वर्षांच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी ८ ते १० रुपयांना पेट्रोल आणि डिझेल स्वस्त करण्याची घोषणा करू शकतात असं तज्ज्ञांचं मत आहे.
किमतीतील ही घट राजकीय आणि उत्पादन कपातीच्या कारणामुळे होईल. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीतील ही घसरण दोन वर्षांनी होईल. 2023 च्या शेवटच्या ट्रेडिंग आठवड्याच्या शेवटच्या दिवशी, ब्रेंट क्रूड 0.6 टक्क्यांनी वाढून वायदे बाजारात $ 77.63 प्रति बॅरल होता. त्याच वेळी, डब्ल्यूटीआय क्रूड फ्युचर्स 0.5 टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल $ 72.14 वर पोहोचले.
लाल समुद्रात येमेनच्या बंडखोरांच्या हल्ल्याच्या भीतीमुळे अनेक शिपिंग कंपन्या या मार्गाने व्यवसाय करत नाहीत, त्यामुळे तेलाच्या किमती वाढल्या होत्या. आता काही कंपन्यांनी लाल समुद्रातून जहाजे पाठवण्यास सहमती दर्शवली आहे, ज्यामुळे शुक्रवारी 3 टक्के घट दिसून आली.वृत्तसंस्थाच्या सर्वेक्षणात, 30 अर्थशास्त्रज्ञ आणि तज्ञांनी 2024 मध्ये बेंट क्रूड ऑइलची किंमत प्रति बॅरल $ 84.43 असेल असा अंदाज व्यक्त केला आहे. यासोबतच, तेलाच्या किमतीवर OPEC+ द्वारे उत्पादन कपातीचा कोणताही परिणाम झालेला नाही.
देशातील सरकारी तेल कंपन्यांनी म्हणजे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशनने यावर्षी प्रचंड नफा कमावला आहे. 6 एप्रिल 2022 पासून एक्स-रिफायनरी किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत या सरकारी तेल कंपन्यांनी सुमारे 58,198 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे.
या जागतिक आणि देशांतर्गत संकेतांचा हवाला देत तेलाच्या किमती 10 रुपयांनी घसरण्याची शक्यता अनेक अहवाल व्यक्त करत आहेत. सध्या सरकार आणि तेल कंपन्यांकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.