मंचर -पेठ-वलखेड वस्ती (ता. आंबेगाव) येथे अज्ञात व्यक्तीने ठिबक सिंचनाच्या प्लॅस्टिक पाइपच्या साह्याने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या व्यक्तीची अजून ओळख पटलेली नाही.
पेठ (ता. आंबेगाव) गावच्या हद्दीमध्ये वलखेड वस्ती येथील म्हातारबा शिवराम पवळे यांच्या पडीक जमिनीत लिंबाच्या झाडाला अज्ञात व्यक्तीने फाशी घेतली आहे. या व्यक्तीचे वय अंदाजे 32 वर्षे आहे. याबाबतची माहिती पोलीस पाटील सविता माठे यांनी मंचर पोलिसांना दिली. या व्यक्तीच्या खिशात एसबीआय बॅंकेचे एटीएम कार्ड असून, त्यावर विशाल भालेराव असे नाव आहे.
मात्र, या नावाची सर्वत्र चौकशी केली असता कोणी आढळले नाही. मृत व्यक्तीच्या अंगात काळ्या रंगाचे जर्किंग, काळ्या रंगाची जीन्स पॅन्ट, उजव्या हातावर कोपराजवळ अर्चना मराठीत व इंग्रजीत एस असे गोंदलेले असून, दंडावर ओम आहे. या व्यक्तिबाबत माहिती मिळाल्यास मंचर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.