पुणे – ‘सर्व सदस्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत महापालिकेची मुख्यसभा चालवण्याला परवानगी द्या,’ अशी मागणी करण्यासाठी महापौरांच्या नेतृत्त्वाखाली सर्वपक्षीय शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे, असे मुरलीधर मोहोळ यांनी बुधवारी मुख्यसभेत सांगितले.
गेल्या सात महिन्यांपासून मुख्यसभा चर्चेविना तहकूब करण्यात येत आहे. तर सदस्यांनी आंदोलन केले किंवा काही मागणी केली, तरी राज्य सरकारच्या आदेशाचे कारण देत रेटून मुख्यसभा तहकूब केली जात आहे. याशिवाय अनेक विषयही मंजूर न करता पुढे ढकलले जात आहेत. बुधवारी तर दहा सभा होत्या. त्या दहाही सभा तहकूब करून पुढील महिन्याच्या कार्यपत्रिकेवर घेल्या आहेत.
“मुख्यसभा चालली पाहिजे, अशी सर्व पक्षातील सदस्य आणि वैयक्तिक आपलीही भूमिका आहे. परंतु राज्यसरकारचे तसे आदेश आहेत. त्यानुसार आपण ऑनलाइन सभा घेत आहोत. त्यालाही मर्यादा आहेत. अनेक सदस्यांना आपले म्हणणे मांडायचे आहेत, त्यांचे प्रभागातील प्रश्न येथे उपस्थित करायचे आहेत. मात्र ते गेल्या सात महिन्यांत शक्य होत नाही,’ असे मोहोळ म्हणाले.