आंबिल ओढ्यासाठी अखेर धावाधाव…

सीमाभिंतीचे काम लवकरच : अतिरिक्त आयुक्तांकडून पाहणी


ओढ्यालगतीची अतिक्रमणेही काढणार

कात्रज – आंबिल ओढ्यावरील 3 किमी लांबीची सीमाभिंत बांधण्याच्या कामाचे कार्यादेश दिल्यानंतर महापालिका अतिरिक्त आयुक्त शांतनु गोयल यांनी धनकवडी, बिबवेवाडी व कात्रज भागात पाहणी केली.

आंबिल ओढा संरक्षणासाठी महापालिका प्रशासनाने सुमारे 20 कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया राबविली आहे. सुरुवातीपासूनच महापालिका प्रशासनाने राबवलेली निविदा प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. जागा ताब्यात आलेली नसताना प्रशासनाने निविदा प्रक्रिया राबविल्यामुळे पुन्हा एकदा ती वादात आली होती. त्यानंतर 60 टक्के जागा ताब्यात आली आहे. मात्र, उर्वरित जागेवर अडथळे ठरणारी अतिक्रमणे काढण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याने यासाठी अतिरिक्त आयुक्‍तांनी आज पाहणी केली.

पुण्याच्या दक्षिण भागात गेल्यावर्षी दि. 25 सप्टेंबरला झालेल्या अतिवृष्टीमुळे आंबिल ओढ्याला पूर आला होता. त्यामुळे कात्रजसह काशिनाथ पाटीलनगर, पुण्याईनगर, बालाजीनगर, बिबवेवाडी, कात्रज येथे ओढ्यालगत असणाऱ्या संरक्षक भिंतीची अनेक ठिकाणी पडझड झाली. ड्रेनेजलाइन देखील वाहून गेल्या. अशा ठिकाणी नव्याने संरक्षक भिंत तसेच ड्रेनेजलाइन टाकावी, अशी मागणी नगरसेवक दत्तात्रय धनकवडे यांनी महापौर मुरलीधर मोहोळ तसेच तत्कालिन आयुक्तांकडे केली होती.

सध्या आठवडाभर मुसळधार पाऊस सलग पडत आहे. अतिवृष्टीत (दि.18) काशिनाथ पाटीलनगर येथील ताई कॉम्प्लेक्‍स येथे आंबिल ओढ्यालगत असलेली सीमाभिंत कोसळली. यामुळे हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. याकामी वर्षभरापासून चालढकल होत असल्याने नागरिकांनीही कमालीची नाराजी व्यक्त केली.

यामुळे उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार यांना भेटून नगरसेवक दत्तात्रय धनकवडे यांनी कामाची स्थिती लक्षात आणून दिली. यानुसार पवार यांनी याकामी पालिकेला सीमाभिंत बांधण्याचे आदेश तातडीने काढले. या पाहणीवेळी मुख्य अभियंता खानोरे, अधीक्षक अभियंता शिर्के, उपअभियता पवार, सहाय्यक आयुक्त नाताले तसेच इतर अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सिंहगड रस्त्यावर अतोनात नुकसान
सिंहगड रस्त्यावरील प्रभाग 34 मध्ये पावसाचे पाणी शिरल्यामुळे अतोनात नुकसान झाले असून महापालिकेने पावसाळी कामे करून देण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्तांकडे केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रभाग 34 मधील अध्यक्ष स्वराज गोसावी, कार्याध्यक्ष गौरव कापरे, राजेश आहेर, निलेश कारेकर आदींनी बुधवारी आयुक्तांची भेट घेतली.

विठ्ठलवाडी परिसरातील कंपन्या आणि ओढ्यालगत परिसर याचे प्रमुख कारण ओढ्यात पडलेले ब्लॉक आणि कचरा आहे. ते साफ न केल्यामुळे पाणी ओव्हरफ्लो होते, असे या शिष्टमंडळाचे म्हणणे आहे. याशिवाय त्यांनी याभागातील अन्य प्रश्‍नही मांडले. त्यावर या भागातील पावसाळी चेंबर दुरुस्ती आणि साफ करावे, ड्रेनेज लाइन साफ करावे, संतोष हॉल चौक, गिरे बंधू भेळ यांच्या समोरील दुभाजक फोडून जाळी बसवून द्यावी, ओढ्यालगतच्या सोसायट्यांच्या भिंती दुरुस्त करावी, ज्या दुकानदारांचे नुकसान झाले आहे त्यांना नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणीही त्यांनी आयुक्तांकडे केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.