स्वच्छतेसह तांत्रिक सुविधांची पाहणी, चाचणी सुरू : शासन आदेशाची प्रतीक्षा
पुणे – करोनामुळे गेली सात महिने बंद असलेली शहरातील नाट्यगृहे लवकरच खुली करण्याचे संकेत राज्य शासनाने दिले आहेत. मात्र, तत्पूर्वी नाट्यगृहांची स्वच्छता, तांत्रिक यंत्रणा आणि इतर सुविधांचा आढावा महापालिका अधिकारी घेत आहेत. याच अनुषंगाने बुधवारी (दि.21) बालगंधर्व नाट्यगृह आणि परिसराची स्वच्छता करण्यात आली.
राज्य सरकारने नाट्यगृहांतील कार्यक्रमांना परवानगी दिली, तर डागडुजी आणि स्वच्छतेसाठी दोन आठवडे जातील. त्यामुळे त्यापूर्वीच नाट्यगृहे पूर्वस्थितीत आणणे गरजेचे आहे. म्हणून आतापासूनच पालिकेने नाट्यगृहांची स्वच्छता करून घ्यावी, अशी मागणी सातत्याने विविध सांस्कृतिक संघटनांचे प्रतिनिधी करत आहेत.
तसेच विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी देखील नाट्यगृहांच्या अवस्थेबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश सर्व महापालिकांना दिले आहेत.
दरम्यान, महापालिकेच्या नाट्यगृहांचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी असलेल्या भवन विभागाचे अधिकारी सुनील मते म्हणाले, “महापालिकेतर्फे नाट्यगृहांची पाहणी करण्यात आली आहे.
ज्या नाट्यगृहांना पावसामुळे समस्या निर्माण होत आहेत, तेथे वॉटरप्रूफिंग केली जाणार आहे. सध्या बालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, अण्णा भाऊ साठे नाट्यगृह आणि गणेश कला क्रीडा मंच येथे प्रामुख्याने स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले आहे. तसेच तांत्रिक सुविधांची पाहणी, चाचणी केली जात आहे.’