तिरुअनंतपुरम- कोरोनाच्या संकट काळात सर्वच राज्यात अनेक सुविधा बंद करण्यात आल्या होत्या. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. त्यामुळे आता देशात काही सुविधा सुरु करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून मागील अनेक महिन्यांपासून बंद असणारे स्पा, आयुर्वेदिक रिसॉर्ट्स आणि अशा प्रकारच्या इतर सुविधा केरळमध्ये सुरु करण्यात आल्या आहेत.
स्पा, आयुर्वेदिक रिसॉर्ट्स सुरु करण्यासाठी आज केरळच्या सरकारने परवानगी दिली आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे सर्व सुविधा बंद करण्यात आल्या होत्या. मात्र आता सरकारच्या या निर्णयामुळे आता स्पा आणि आयुर्वेदिक रिसॉर्ट मालकांना दिलासा मिळाला आहे. मात्र सरकारने ही परवानगी देत असताना कोरोनाचे सर्व नियम पाळणे बंधनकारक असल्याचे सांगितले आहे.
दक्षिणेकडील राज्यामध्ये स्पा आणि आयुर्वेदिक रिसॉर्ट्समध्ये स्थानिकांसह आंतरराष्ट्रीय पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात. याचाच विचार करून राज्याचे पर्यटनमंत्री कडकंपल्ली सुरेंद्रन म्हणाले की, कोरोनव्हायरसचा प्रादुर्भाव झाल्यानंतर बंद असलेले राज्यातील स्पा आणि आयुर्वेदिक रिसॉर्ट्स पुन्हा सुरू करण्याचा आदेश देण्यात आला आहे.
“कोविड प्रोटोकॉलचे पालन करून अशा संस्था पूर्णपणे उघडल्या जाऊ शकतात. स्वच्छता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी त्यांनी सर्व खबरदारी घेणे आवश्यक आहे,” ते म्हणाले. तसेच सरकारने घालून दिलेल्या सर्व नियम व अटी मान्य करणे स्पा, आयुर्वेदिक रिसॉर्ट्स मालकांना बंधनकारक आहे.