पिंपरी – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची निगडी येथे संगीत अकादमी असताना आता पुन्हा आणखी एक संगीत अकादमी सुरू करण्याचा प्रस्ताव स्थायी समिती सभेसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. या प्रस्तावामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सध्या एक संगीत अकादमी असताना आणखी एक संगीत अकादमी कशासाठी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महापालिकेच्या वतीने सध्या निगडी येथे संगीत अकादमी कार्यरत आहे. या अकादमी अंतर्गत चिंचवड, संभाजीनगर, संत तुकारामनगर येथे संगीत वर्ग चालविले जातात. त्यामध्ये प्रामुख्याने शास्त्रीय गायन, सुगम गायन, तबला वादन, हार्मोनियम वादन आदी शिकविले जातात.
संगीत अकादमीमध्ये प्रशिक्षित झालेल्या विद्यार्थ्यांना अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय (मुंबई) या संस्थेमार्फत परीक्षेला बसविण्यात येते. संगीत अकादमी सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत प्रारंभिक ते विशारद या परीक्षांमध्ये अंदाजे दीड हजारांपेक्षा आधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
एखाद्याच्या हट्टासाठी उपद्व्याप
पिंपरी-चिंचवड शहराचा आता स्मार्ट सिटीमध्ये समावेश झाला आहे. महापालिकेकडून नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. शहरामध्ये सांस्कृतिक चळवळ निर्माण व्हावी तसेच नागरिकांचा सहभाग वाढावा, यासाठी कला, संगीत अकादमीच्या कामकाजाचा विस्तार करण्याची गरज निर्माण झाली असल्याचा दावा महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आला आहे.
शहरामध्ये कला, संगीत अकादमीचे काम निरंतर चालविण्यासाठी शास्त्रीय गायक महेश काळे यांनी 1 डिसेंबर 2020 रोजी महापालिका प्रशासनाला ई-मेल पाठविला होता. शहरातील विद्यार्थी व उदयोन्मुख कलाकारांना व्यासपीठ मिळवुन देण्यासाठी महेश काळे स्कुल ऑफ म्युझिक व महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने संगीत अकादमी चालू करावी, असा मागणी प्रस्ताव ठेवला होता. त्यांनी मांडलेल्या प्रस्तावानुसार शुक्रवारी (दि. 8) होणाऱ्या स्थायी समिती सभेसमोर नवीन संगीत अकादमी सुरू करण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी आला आहे. मात्र शुक्रवारची सभा तहकूब झाल्याने त्यावर अंतिम निर्णय झालेला नाही.
खासगी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शुल्क
नवीन अकादमीचे काम करताना सध्या महापालिकेच्या निगडी येथील संगीत अकादमीच्या जागेचाही वापर करण्याचे नियोजित आहे. त्याशिवाय, ही नवीन अकादमी निगडी कलादालन येथे सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. या अकादमीसाठी महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश असेल. तर, खासगी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी 1 हजार रुपये इतके शुल्क आकारले जाणार आहे.