पुणे: चिमुकलीमुळे आठ वर्षांपासून विभक्त राहणारे दांपत्य पुन्हा एकत्र

पुणे – मतभेद आणि गैरसमजामुळे तब्बल आठ वर्षांपासून वेगळे राहणारे पती-पत्नी पुन्हा एकत्र आले. चार मुलींच्या शिक्षण आणि भवितव्याचा विचार करून दोघांनी हा निर्णय घेतला. नव्याने सुखाने संसार सुरू केला आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. मुजुमदार यांच्या न्यायालयात हजर राहत दोघांनी याबाबतची माहिती दिली. दोघे एकत्र येण्यासाठी ऍड. एकनाथ सुगावकर यांनी दोन वर्षे प्रयत्न केले. 

माधव आणि माधवी (नावे बदलली आहेत) यांचा विवाह नोव्हेंबर 2003 मध्ये झाला. दोघांना चार मुली आहेत. घरच्यांनी जमवून दोघांचा विवाह लावून दिला. जाऊची प्रसुती झाल्याने लग्न झालेल्या पहिल्यादिवसापासून माधवीला करावी लागली. तिला लग्नानंतर चार-पाच दिवसांनी अपेक्षित असतानाही माहेरी पाठविले नाही. लग्नाच्या पाचव्या दिवशी माधव घरी दारू पिऊन आला. तिला मानसिक धक्काच बसला. त्याला असलेल्या व्यसनाची माहिती देण्यात आली नव्हती. उलट याबाबत माहेरच्या लोकांशी बोलू नको, म्हणून तिला धमकाविण्यात आले.

त्यानंतर पहिल्या मुलीच्या प्रसुतीसाठी ती माहेरला गेल्यानंतर माधव मित्रासह तेथे दारू पिऊन गेला होता. तिच्याशी वाद घातला. पहिली मुलगी झाल्यानंतरही, मुलगी झाली म्हणून वाद घातला. दहा हजार रुपये वडिलांकडून घेतल्यानंतर तिला माहेरी जावू दिले. फेब्रुवारी 2005 सासु-सासऱ्यांनी 80 हजार तिच्या वडिलांकडे मागितले. ते देऊ न शकल्याने तिला माहेरी जाण्यास मज्जाव करण्यात आला.

आजोबा वारल्यानंतर अंत्यसंस्कारास जावू दिले नाही. तिच्या चरित्र्यावर संशय घेण्यात आला. या त्रासाला कंटाळून तिने 2012 कौटुंबिक हिंसाचार कायद्यानुसार न्यायालयात धाव घेतली होती. तेव्हापासून ते दोघे विभक्त राहत होते. मात्र, ऍड. एकनाथ सुगावकर यांनी केलेल्या यशस्वी समुपदेशनामुळे ते एकत्र आले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.