इंडिगो कंपनीची सुरक्षिततेसाठी नवी योजना
नवी दिल्ली – एकाच प्रवाशाला दोन सिट बुक करण्याचा नवा प्लॅन इंडिगो कंपनीने जाहीर केला आहे. यामुळे विमानात शेजारची जागा रिकामी राहील आणि करोना व्हायरसचा संसर्ग होण्याची शक्यता कमी होईल. जे प्रवासी योजना स्वीकारतील त्यांना दुसरी सीट बुक करताना प्रचलित दरापेक्षा 25 टक्के कमी भाडे द्यावे लागेल, असे कंपनीने म्हटले आहे.
या योजनेची अंमलबजावणी 24 जुलैपासून होणाऱ्या प्रवासासाठी करण्यात येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. प्रवाशांनी स्वतः बुकिंग केले किंवा एजंटच्या माध्यमातून बुकिंग केले तरी या योजनेचा लाभ घेता येऊ शकणार आहे, असे कंपनीने म्हटले आहे.
मात्र, संबंधित प्रवाशाला जास्त बॅगेज घेऊन जाता येणार नाही. या सीट बुक करण्याचे किंवा केलेले बुकिंग रद्द करण्याचे नियम इतर सीटप्रमाणेच राहणार आहेत. भारतामध्ये देशांतर्गत विमानसेवा सुरू झाली आहे. मात्र, इकॉनॉमी क्लासमध्ये दोन प्रवाशातील अंतर बरेच कमी असते. त्यामुळे संसर्ग होईल या भीतीने प्रवासी प्रवास करण्याचे टाळत आहेत. अशा परिस्थितीमध्ये त्यांना प्रवास करण्याची गरज आहे. त्यांना संसर्ग टाळून या पद्धतीने प्रवास करता येऊ शकेल, असे कंपनीला वाटते.