नगर – नगर-औरंगाबाद रस्त्यावरील सनी पॅलेसमागील सूर्यनगरला आज आठ करोनाबाधित आढळल्याने हा परिसर कन्टेन्मेंट झोन घोषित करण्यात आला आहे. याशिवाय तारकपूर भागातही नवे रुग्ण आढळल्याने हा परिसर कन्टेन्मेंट परिसर म्हणून घोषित करण्यात आला आहे.
महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार, शहर अभियंता सुरेश इथापे यांच्यासह माजी नगरसेवक निखिल वारे, बाळासाहेब पवार, नगरसेवक सुनील त्रिंबके, विनित पाऊलबुधे, डॉ. गणेश मोहोळकर यांनी या भागाची आज पाहणी केली. एकाचवेळी जास्त रुग्ण सापडल्याने सूर्यनगरच्या नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. त्या सर्वांना धीर देण्याचे काम प्रभागातील चारही नगरसेवकांनी आज केले.
मनपाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने उपाययोजना करण्याची कार्यवाही सुरू केली. या भागात आज औषध फवारणी करण्यात आली. तसेच नागरिकांची आरोग्य तपासणी सुरू करण्यात आली आहे. नागरिकांनी घाबरुन न जाता स्वत:हून पुढे येऊन तपासणी करुन घ्यावी. करोनामुक्त होण्याचे प्रमाण जास्त आहे, असे आवाहन निखिल वारे यांनी नागरिकांना केले.