पुणे – चित्रपट, वेब सीरिजमधून भारतीय सैन्य दलाच्या प्रतिमेचे हनन करण्याच्या प्रकरणांबाबत संरक्षण मंत्रालयाने गंभीर दखल घेतली आहे. मंत्रालयाने शुक्रवारी या संदर्भातील परिपत्रक काढत “सैन्यदलाशी निगडित विषयांच्या चित्रपट, वेब सीरिजच्या प्रकाशनापूर्वी संरक्षण मंत्रालयाचे ना हरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे,’ आदेश केंद्रीय चित्रपट नियामक मंडळाला दिले आहेत.
अलीकडील काळात सैन्य दलावर आधारित चित्रपट आणि वेबसीरिज निर्मिती वाढली आहे. मात्र, अनेकदा या माध्यमातून सैन्य दलाबाबत चुकीचे चित्रण करणे, सैन्याची प्रतिमा मलीन करणारी दृश्ये दाखविण्याचे प्रकार घडत असल्याचा आरोप माजी सैनिकांनी केला आहे. नुकत्याच एका वेब सीरिजमध्ये सैन्य अधिकाऱ्यांच्या पत्नींची प्रतिमा मलीन करणारी दृश्ये दाखविल्याने वाद निर्माण झाला होता.
त्याविरोधात आवाज उठवत लष्कराच्या अनेक माजी अधिकाऱ्यांनी “अशा दृश्यांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे असून, संरक्षण मंत्रालयाने याबाबत योग्य कारवाई करावी,’ अशी मागणी केली होती. यावर मंत्रालयाने हे आदेश काढले आहेत.
सशस्त्र दलावरील चित्रणाबाबतचे वाद
– ट्रिपल एस वेब सीरिज : सैन्य दलातील अधिकाऱ्याची पत्नी आणि तिचा मित्र यांच्यामधील दृश्यांमुळे सैन्य अधिकाऱ्यांच्या पत्नींची प्रतिमेला ठेच पोहचवल्याचा आरोप.
– हैदर चित्रपट : काश्मीरमधील सैन्य दलाच्या तळांमध्ये काश्मिरी तरुणांवर अत्याचार केले जात असल्याच्या दृष्यांवरून वाद
– उरी चित्रपट : अनेक दृष्ये वास्तवाशी संबंधित नसून, अवास्तवी दृष्यांमुळे सैन्य दलाच्या कामाबद्दल चुकीच संदेश गेल्याचा आरोप
– ए दिल है मुश्किल : चित्रपटात सैनिक कल्याण निधीसाठी 5 कोटी देण्याच्या मागणीमुळे राजकीय स्वार्थासाठी सैन्य दलाचा वापर केला जात असल्याचा आरोप.
भारतीय चित्रपट आणि वेब सीरिजमधून अनेकदा सैन्य दलाबाबत अतिशय चुकीचे आणि अपमानकारक दृश्ये दाखवण्यात येतात. यामुळे नकारात्मक प्रतिमा तयार होऊन सैन्य दलावरील विश्वासाला तडा जाऊ शकतो. त्यामुळेच चित्रपट आणि वेब सीरिजमधून सैन्य दलाबाबत चित्रीत होणारे अपमानकारक, नकारात्मक चित्रण रोखणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने संरक्षण मंत्रालयाने घेतलेला हा निर्णय अतिशय योग्य आहे.’ (ब्रिगेडिअर हेमंत महाजन (नि.)
चित्रपट, वेब सीरिजमधील एखाद्या दृष्याबद्दल आक्षेप असेल, तर तो मान्य करता येईल. परंतु पूर्ण विषयच चुकीचा ठरवला जाणार असेल, तर ते योग्य ठरणार नाही. सैन्याबद्दल देशातील प्रत्येक व्यक्तीला आदर आहे आणि तो राखणे गरजेचेच आहे. त्यामुळे चित्रपट अथवा वेब सीरिज निर्मात्यांनी आपण सैन्य दलाचा अवमान तर करत नाही ना, याबाबत निश्चितच काळजी घेतली पाहिजे. मात्र, यामुळे अभिव्यक्तीचा अधिकार हिरावणे योग्य ठरणार नाही. (मेघराज राजे भोसले, अध्यक्ष, अखिल भारतीय चित्रपट महामंडळ)