मुंबई : महाराष्ट्र कोरोनाविरुद्धची लढाई लढत असतानाच आर्थिक स्तरावरही आता महत्त्वाचे निर्णय घेण्यास सुरुवात झाली आहे. राज्यात स्थावर मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरु करुन त्यांची नोंदणी पूर्ववत ऑनलाईन पद्धतीने करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
आरोग्यविषयक कामांची गरज लक्षात घेऊन चालू आर्थिक वर्षासाठी जिल्हा नियोजन योजनेचा 25 टक्के निधी आरोग्यविषयक कामांकडे वळवण्यात येणार आहे. आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण, पोलीस, होमगार्ड व इतर विभागातील अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे वेतन-मानधन तात्काळ अदा करण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहेत. कोरोनाच्यासंदर्भात उपाययोजना करण्यासाठी स्थापन मंत्रिमंडळ उपसमितीने हे निर्णय घेतल्याची माहिती समितीप्रमुख तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली.