नवी दिल्ली – भारतासह संपूर्ण जग सध्या करोना विषाणू संक्रमण रोखण्यासाठी लढत असताना पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात असल्याचा आरोप लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी केला आहे.
देशात लॉकडाऊन लागू झाल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी जनरल नरवणे दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. लॉकडाऊन लागू झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच काश्मीर दौरा आहे. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करून नियंत्रण रेषेवर गोळीबार करण्यात येतो आहे. शस्त्रसंधीच्या उल्लंघनात पाकिस्तानकडून वाढच झाली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी पाकिस्तानवर टीका केली.
जनरल नरवणे म्हणाले, करोना संक्रमणामुळे भारत आणि जगातील सगळेच देश या विषाणूविरोधात लढा देत आहेत. पण आमच्या शेजारी देशाने याही स्थितीत आपल्या कारवाया करणे सुरूच ठेवले आहे. या कठीण प्रसंगात भारत जगातील इतर देशांना वैद्यकीय स्वरुपाची मदत करतो आहे. औषधे, वैद्यकीय साधने निर्यात करण्यात येत आहेत. पण दुसऱ्या बाजूला पाकिस्तानकडून दहशतवाद निर्यात करण्याचे काम वेगाने सुरूच आहे.
काश्मीर खोऱ्यातील केरान भागात पाच एप्रिलला झालेल्या चकमकीत पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. पण यावेळी पाच जवान शहीदही झाले होते. दहशतवादी घुसखोरी करून भारतात शिरण्याच्या प्रयत्नात होते. त्यावेळी त्याचे हे कृत्य उधळून लावण्यात आले.