इस्लामपूर / प्रतिनिधी – येथील राष्ट्रवादी काँग्रेसचा स्वीकृत नगरसेवक खंडेराव जाधव याच्या संबंधित असणाऱ्या हॉटेल न्यू-राजभवन बिअर बारचा परवाना जिल्हाधिकारी डॉ.अभिजित चौधरी यांनी कायमस्वरूपी रद्द केल्याचे आदेश दिले आहेत.
कोरोना काळात कंटेन्मेंटझोनमध्ये असतानाही या बियर बारमधून चोरटी दारु होत असल्याची तक्रार झाली होती. राज्य उत्पादन शुल्कच्या अहवालानुसार मद्य साठयातील तफावत व पोलीस विभागाकडील पत्रावरुन ही कारवाई करण्यात आली. जाधवला अद्याप अटक नाही, पण बिअर बार परवाना रद्द करुन त्याला हादरा दिला आहे. दि.२८ एप्रिल रोजी नगरपालिकेच्या घंटागाडीमधून कंटेन्मेंटझोन मधील बिअर बारमधून चोरट्या दारुची वाहतुक होत असल्याची तक्रार स्थानिक नगरसेवक अमित ओसवाल यांनी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार-पवार यांच्याकडे केली. त्यांनी याबाबत पोलिसांना कळवून कारवाईचा पवित्रा घेतला. मुकादम यास प्राधिकृत करुन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले.
दरम्यान जाधव याने ही कारवाई रोखण्यासाठी पवार यांच्या केबिनमध्ये घुसून खुर्ची घेवून अंगावर धावून जावून त्यांना व कुटुंबियांना ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पवार यांनी दि.२८ रोजी धमकीची फिर्याद पोलिसांकडे दिली. दारु वाहतूक प्रकरणी त्यांनी स्वतः दुसऱ्या दिवशी जाधव याच्यासह घंटागाडी चालक, मदतनीस, बार परवाना धारक यांच्याविरुद्ध फिर्याद दिली. या बारचा परवाना खंडेराव जाधव याच्या भावजयी सुलोचना परशुराम जाधव यांच्या नावावर आहे.
याप्रकारानंतर राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकान्यांनी या बारची तपासणी करुन अहवाल दिला. त्यात बार बंद ठेवण्याच्या आदेश काळात या बारमधून मद्य विक्री झाल्याचे समोर आले. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी मुंबई दारुबंदी कायदा १९४९ चे नियम ५४(१)(सी)मधील तरतुदीनुसार कारवाई केली. हा परवाना कायमस्वरुपी रद्द केल्याचे आदेश त्यांनी दिले. तसेच इस्लामपूर राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक यांच्याकडे हा आदेश पुढील कार्यवाहीसाठी दिला असून या कार्यवाहीचा अहवाल तात्काळ देण्याचे आदेश केले आहेत.
मद्यविक्रीत आढळली तफावत
हॉटेल न्यू राजभवन बिअर बारमधून बंद कालावधीमध्येही मोठया प्रमाणात मद्य विक्री केल्याचे दिसून
आले आहे. विदेशी मद्याच्या १ लिटरच्या ६७, १८० मिलीच्या १५५१ बाटल्या तसेच ६५० मिलीच्या १४ व ३३० मिलिच्या २८३ बियरच्या बाटल्यांची तफावत आढळली आहे.