दोन्ही गावच्या हद्दीवरील रहिवासी सुविधांपासून वंचित

साडेसात दशकांचा तिढा : शंकरवाडीची स्थानिक ग्रामपंचायतीमध्ये समावेशाची मागणी

घोरावडेश्‍वराच्या पायथ्यालगतची वस्ती : पाण्याचा प्रश्‍न गंभीर

सोमाटणे – सोमाटणे आणि तळेगाव दाभाडे गावच्या हद्दीवर असलेल्या शंकरवाडी क्र. 1 व शंकरवाडी क्र. 2 या गावांचा समावेश ग्रामपंचायतीत अथवा नगरपरिषदेत करावा, अशी मागणी शंकरवाडी ग्रामस्थांनी केली आहे. दोन्ही गावच्या हद्दीवर असलेले हे रहिवासी मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत.

घोरवडेश्‍वर डोंगराच्या पायथ्याला वसलेल्या शंकरवाडी नंबर एक हे सोमाटणे गावाच्या हद्दीलगत आहे. शंकरवाडी नंबर दोन आदिवासीवाडी सोमाटणे व तळेगाव दाभाडे यांच्या हद्दीजवळ येत आहे. या गावाचा समावेश हा सोमाटणे ग्रामपंचायत अथवा तळेगाव नगरपरिषद या दोन्हीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये समावेश नसल्याने गेल्या साडेसात दशकापासून या दोन्ही वाड्या नागरी सुविधांपासून
वंचित आहेत.

या दोन्ही वाड्यातील 75 घरात जवळपास सुमारे 300-350 च्या आसपास लोकसंख्या आहे. दोन्ही वाड्यातील सुमारे 250 मतदार आहेत. येथील मतदार लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाचा हक्‍क बजावतात.
मात्र त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत मतदानाचा हक्‍क बजावता येत नाही, असे दावा स्थानिक रहिवाशांनी केला आहे.

सामाजिक बांधिलकी म्हणून मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने ग्रामपंचायतीने दहा वर्षांपासून 2 इंच पाईपद्वारे नळजोडणी करून वाडीला पाण्याची सुविधा पुरवली; परंतु या पाईप लाईनवर टोल प्लाझा, हॉटेल, टिंबर आदींना पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने या वाडीजवळ असलेल्या तसेच उंच भागामुळे जलवाहिनीवर दाब आल्याने या वाडीला कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. परिणामी महिलांना पाण्यासाठी सकाळी, सायंकाळी वाट पहावी लगत असते. पाणी भरण्यासाठी हंडे व प्लॅस्टिकचे ड्रमची लांबलचक रांग लावावी लागत आहे. सकाळी सुमारे 4-4 तास महिला भगिनींना वेळ खर्च करावा लागत आहे.

स्वच्छतागृहाचा “पत्ता’च नाही… – 
शंकरवाडी येथे एकही कुटुंबाकडे स्वच्छतागृह नाही. त्यामुळे येथील महिला व पुरुषांना उघड्यावर शौचास जावे लागत आहे. याशिवाय घोरवडेश्‍वर डोंगरावर मोठ्या प्रमाणात भाविकांची व व्यायामाकरिता नागरिकांची वर्दळ असल्याने उजेडण्याच्या आधीच किंवा अंधार पडल्यावरच महिला वर्गांना शौचास बाहेर पडता येते, त्यामुळे येथील महिला वार्गांचा आरोग्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. शासनाने या दोन्ही वाड्यांकडे लक्ष देऊन या वाड्यांचा ग्रामपंचायत अथवा नगरपालिकेत समावेश करून येथील नागरिकांना भौतिक सुविधा पुरविण्यात याव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

शंकरवाडीत सुमारे चार पिढ्यापासून वास्तव्यास आहेत. येथे सुविधा मिळाव्यात यासाठी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करत आहोत. परंतु शासन आमच्याकडे सातत्याने दुर्लक्ष करत आहे. आमचा शासनाने ग्रामपंचायतीमध्ये अथवा नगरपरिषद समावेश करून सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
– ओबन्ना म्हेत्रे, रहिवाशी, शंकरवाडी

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.