पुणे – जुने पुणे म्हणून ओळख असलेल्या कसबा विधानसभा मतदारसंघात गेल्या 25 वर्षांत या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे आमदार आणि विद्यमान खासदार गिरीश बापट यांच्या माध्यमातून अनेक विकासकामे झाली आहेत. या विकासाच्या मार्गावर आपणही मार्गाक्रमण करणार असून मतदारसंघाच्या विकासासाठी “कसबा फर्स्ट’ ही संकल्पना राबविण्यावर आपला भर राहणार असून त्यात, वाड्यांचा पुनर्विकास, बारा बलुतेदारांसाठी विशेष व्यवसाय योजना, हेरिटेज वास्तूंचे संवर्धन करून मतदारसंघाला विशेष ओळख, रस्ता रुंदीकरणातील अनियमितता दूर करणे असे आपले व्यापक व्हिजन असल्याचे या मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार मुक्ता टिळक यांनी सांगितले.
टिळक म्हणाल्या, जुन्या पुण्याचा भाग असलेला कसबा विधानसभा मतदारसंघात जुने वाडे तसेच ऐतिहासिक वास्तूंची संख्या सर्वाधिक आहे. हे वाडे आता मोडकळीस आले असून त्यांच्या पुनर्वसनासाठी क्लस्टर पॉलिसी राबविण्यात येत आहे. त्यासोबतच सर्व संबंधितांना सोबत घेऊन हे पुनर्वसन अधिकाधिक सोपे होईल यावर आपला भर राहणार आहे. या मतदारसंघात बारा बलुतेदारांचे व्यवसाय आहेत. राज्य शासनाच्या माध्यमातून त्यांच्या व्यवसाय वृद्धीसाठी विशेष योजना, त्यांना आर्थिक सहाय्य तसेच व्यवसायात कालानुरूप झालेल्या बदलानुसार, बाजारातील स्पर्धेचा सामना करण्यासाठी त्यांना वेगवेगळी प्रशिक्षण देण्यासाठी पुढाकार घेतला जाणार आहे.
मतदारसंघात कुंभार आळी, तांबट आळी असा शिवकालीन तसेच पेशवेकालीन भाग असून या सांस्कृतीक ठेव्याचे जतन करण्यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे. या व्यावसायिकांचे तसेच या भागाचे जतन करणे तसेच त्याला पूरक छोटे उद्योग निर्मिती तसेच प्रशिक्षण देण्यासाठी योजना राबविण्यावर आपला भर असणार असल्याचे टिळक यांनी स्पष्ट केले.
हेरिटेज कसबा संकल्पनेला प्राधान्य
या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून आपले हेरिटेज कसबा या संकल्पनेला प्राधान्य असणार आहे. मतदारसंघात अनेक शिवकालीन तसेच पेशवेकालीन मंदिरे आहेत. याशिवाय अनेक जुने वाडे तसेच मंदिरेही आहेत. पर्यटनाच्या अनुषंगाने त्याचे जतन, संवर्धन झाल्यास पर्यटकांसाठी ही खास पर्वणी ठरेल. त्या अनुषंगानेच कसबा विधानसभा मतदारसंघ एक पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यासठी हेरिटेज कसबा ही संकल्पना राबविली जाईल. त्यातून लहान व्यवसाय सुरू होऊन, रोजगार निर्मितीही होईल, तसेच स्थानिकांना आर्थिक हातभारही मिळेल.
प्रत्येक एक किलोमीटरच्या अंतरावर स्वच्छतागृह
मतदार संघात व्यापारी पेठांची मोठी संख्या असल्याने गणेशोत्सव, दिवाळी तसेच सणांच्या दिवसांमध्ये मतदारसंघातील सर्वच भागात खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षणीय असते. त्यात महिलांची संख्याही मोठ्या प्रमाणात असते. ही बाब लक्षात घेऊन महिलांसाठी मतदारसंघात प्रत्येक एक किलोमीटरच्या अंतरावर स्वच्छतागृह उभारण्यास आपले प्राधान्य राहणार आहे.