पाण्याचे नियोजन राष्ट्रवादीच करू शकते

निवृत्ती काळे : अतुल बेनकेंच्या प्रचारार्थ मतदारांशी साधला संवाद

ओतूर – जुन्नर तालुक्‍यात पाच धरणे आणि आपले हक्‍काचे पाणी असताना आपल्याला शेतीला पाणी न मिळाल्याने शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. भविष्य काळात पाण्याचे नियोजन राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शरद पवार हेच करू शकतात, असा विश्‍वास, जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक निवृत्ती काळे यांनी साळवाडी येथे केले.

जुन्नर विधानसभा मतदारसंघातील महाआघाडीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार अतुल बेनके यांच्या गावभेट दौरा निमित्त साळवाडी येथे मतदारांशी बोलताना काळे बोलत होते. यावेळी उमेदवार अतुल बेनके, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार, जिल्हा परिषदेचे सदस्य शरद लेंडे, पंचायत समिती सदस्य शाम माळी, गणपत फुलवडे, सुरेश काळे, महेश काळे, किरण शेटे, तान्हाजी काळे, संतोष काळे, प्रदिप चिंचवडे, वैभव काळे, नारायण चिंचवडे आदी मान्यवर उपस्थित होते.

गणपत फुलवडे म्हणाले की, आपला लोकप्रतिनिधी हे थापा मारण्यात पटाईत आहेत. तालुक्‍याच्या हितासाठी कुठल्याही प्रकारचे काम त्यांनी गेल्या पाच वर्षांत केलेली नाही. हे आमदार परत निवडून दिले तर तालुक्‍याचे मोठे विशेषतः शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल. ज्या लोकप्रतिनिधींना पाणी असून शेतकऱ्यांना पाणी देता आले नाही, अशा लोकप्रतिनिधींना घरी पाठवा, असे आवाहन त्यांनी केले.

सुरेश काळे म्हणाले की, तालुक्‍याच्या लोकप्रतिनीधींना शेतकऱ्यांचे काहीही घेणे-देणे नसल्याने त्यांना का म्हणून निवडून द्यायचे? आपल्या शेतकऱ्यांच्या हितासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार अतुल बेनके हेच नेहमीच लढले आहे, त्यामुळे तेच मोठ्या मताधिक्‍याने विजयी होतील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला.

विद्यमान लोकप्रतिनिधींनी गेल्या पंचवार्षिक निवडणुकीच्या वेळी जनतेला सांगितले होते की, मी तालुक्‍यातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देईन. प्रत्यक्षात एकही युवकाला यांनी रोजगार उपलब्ध करून दिलेला नाही. मात्र, वल्लभ बेनके यांच्या दूरदृष्टीमुळे कांदळी येथील औद्योगिक वसाहतमध्ये दोन हजार युवकांना रोजगार उपलब्ध झाला आहे व भविष्यात दोन ते अडीच हजार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणार आहोत.
– अतुल बेनके, उमेदवार, राष्ट्रवादी कॉंग्रेस, जुन्नर विधानसभा मतदारसंघ

Leave A Reply

Your email address will not be published.