नवी दिल्ली – पेगासस प्रकरणात आज कॉंग्रेसने मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. त्यांनी म्हटले आहे की संसदेला धोका दिला गेला, सुप्रीम कोर्टाला फसवले गेले, लोकशाही हॅयजॅक केली गेली, आणि सरकारकडूनच देशद्रोह झाला अशा शब्दात न्युयॉर्क टाईम्सने पेगासस प्रकरणात आज जो गौप्यस्फोट केला आहे त्यावर कॉंग्रेसने आपली प्रतिक्रीया दिली आहे.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आम्ही हा विषय उपस्थित करणार असून या प्रकरणात नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवरील ठपका अधोरेखीत करून त्यांच्याकडून खुलासा मागवणार आहोत असेही कॉंग्रेसने म्हटले आहे.
या प्रकरणाची सुप्रीम कोर्टाने स्वत:हून दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी आणि त्यांनी संसदेबरोबरच कोर्टाचीही जी दिशाभुल केली गेली आहे त्यावर त्यांनी सरकारला जाब विचाराला पाहिजे अशी मागणी कॉंग्रेस प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी केली आहे. कॉंग्रेसच्या या ठाम भूमिकेमुळे संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर पेगासस गौप्यस्फोटाची पूर्ण छाया असणार आहे हे आता स्पष्ट झाले आहे.
कॉंग्रेस प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी आज पत्रकार परिषदेत नमूद केले की, या वृत्तामुळे मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने बेकायदेशीर व घटनाबाह्यपणे पेगासस हे हेरगिरी करणारे स्पायवेअर खरेदी केले असल्याचे पुराव्यानिशी स्पष्ट झाले आहे. लोकशाही हायजॅक करण्यासाठी आणि आपल्याच देशातील लोकांची हेरगिरी करण्यासाठी या सरकारने सार्वजनिक निधीचा दुरूपयोग केला आहे.
मोदी सरकार देशाशी आणि देशातील जनतेशी खोटेपणाने वागले आहे असा आरोपही त्यांनी केला. या साऱ्या प्रकारात पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या भूमिकेवरच थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले आहे. या सरकारने देशाच्या सर्वोच्च न्यायालयालाही फसवले आहे ही अधिक गंभीर बाब आहे असे ते म्हणाले.