पुण्यात शांतता…आता छुपा प्रचार

अखेरच्या दिवशी सर्वच उमेदवारांची सांगता रॅली पावसातच

पुणे – सकाळी 10 वाजल्यापासून सुरू असलेल्या संततधार पावसातच विधानसभा 2019 च्या प्रचाराची रणधुमाळी शनिवारी सायंकाळी पाच वाजता संपली. आता उमेदवारांनी छुप्या प्रचाराला सुरूवात केली असून, सोमवारी सर्व मतदारांचे भविष्य मतपेटीत बंद होणार आहे. यंदा विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपच्या शहराध्यक्षांनाच रिंगणात उतरवले आहे.

वास्तविक प्रचाराची सांगता उमेदवारांच्या मतदार संघातील चौकात किंवा मुख्य रस्त्यावर एखाद्या नेत्याला बोलावून, जंगी प्रचार सभेने केली जात होती. मात्र, यंदा सकाळपासूनच पावसाने लावलेल्या हजेरीमुळे कोणालाच हे शक्‍य झाले नाही. त्यामुळे अनेक उमेदवारांनी पावसातच रॅली उरकून घेतली. पुणे शहरातील आठ विधानसभा मतदार संघातील सर्वच पक्षाच्या उमेदवारांचा गेल्या 15 दिवसांपासून सुरू असलेला प्रचार संध्याकाळी पाच वाजता थंडावला. विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून, तिकिट मिळवण्याची गडबड, त्यानंतर नाराजांचे पक्षांतर, त्यांचे रुसवे फुगवे काढण्यासाठी अधिकृत उमेदवारांची उडालेली धांदल, नेत्यांच्या सभा, रॅली, पत्रकार परिषदा, बंडखोरांची समजूत काढणे अशा एक ना अनेक घटना गेल्या 15 दिवसांत सुरू होत्या. त्यांना अखेर पूर्णविराम मिळाला.

पुणे शहरातील विधानसभा क्षेत्रनिहाय लढती
कोथरूड : पुण्यातील आठ विधानसभा मतदार संघातील एक असलेल्या आणि भाजप-शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या या मतदार संघात खुद्द भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना उमेदवारी मिळाली असून, ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. येथे दुरंगी लढत पहायला मिळणार असून, आघाडीने मनसे उमेदवार किशोर शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे दोघांमध्येच ही लढत होणार आहे.
कसबा : हा मतदार संघदेखील भाजपचा बालेकिल्ला आहे. याठिकाणीही तिरंगी लढत पहायला मिळणार आहे. महायुतीने याठिकाणी विद्यमान महापौर मुक्ता टिळक यांना उमेदवारी दिली आहे तर आघाडीतर्फे अरविंद शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या मतदार संघात शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे यांनी बंडखोरी केली असून, त्यांनी अर्ज मागे घेण्याला नकार दिल्याने ही लढत तिरंगी होणार आहे.
शिवाजीनगर : येथून महायुतीने माजी खासदार अनिल शिरोळे यांचे चिरंजीव आणि विद्यमान नगरसेवक सिद्धार्थ यांना उमेदवारी दिली आहे, तर आघाडीने दत्तात्रय बहिरट यांना उमेदवारी दिली आहे. मनसेने सुहास निम्हण यांना उमेदवारी दिली आहे.
हडपसर : येथे तिरंगी लढत पहायला मिळणार आहे. महायुतीकडून विद्यमान आमदार योगेश टिळेकर, आघाडीतर्फे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चेतन तुपे आणि मनसेकडून विद्यमान नगरसेवक वसंत मोरे रिंगणात आहेत.
वडगाव शेरी : मतदार संघात विद्यमान आमदार जगदीश मुळीक यांनाच भाजपने पुन्हा उमेदवारी दिली आहे, तर आघाडीने सुनील टिंगरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. एमआयएम आणि वंचितनेही याठिकाणी उमेदवार दिला आहे.
पुणे कॅन्टोन्मेंट : हा मतदार संघ मागास प्रवर्गासाठी राखीव असल्याने याठिकाणी इच्छुकांची संख्या 80 पेक्षा जास्त होती. मात्र सुमारे 50 पेक्षा जास्त जणांनी माघार घेतली. या मतदार संघात विद्यमान आमदार दिलीप कांबळे यांचे बंधू आणि महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष सुनील कांबळे यांना महायुतीतर्फे उमेदवारी देण्यात आली आहे. तर आघाडीतर्फे माजी आमदार आणि कॉंग्रेस शहराध्यक्ष रमेश बागवे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
पर्वती : येथे महायुतीने विद्यमान आमदार आणि भाजप शहराध्यक्षा माधुरी मिसाळ यांना उमेदवारी दिली आहे. तर आघाडीने विद्यमान नगरसेविका अश्‍विनी कदम यांना रिंगणात उतरवले आहे.
खडकवासला : विधानसभा मतदार संघात महायुतीने विद्यमान आमदार भी मराव तापकीर यांना उमेदवारी दिली आहे तर आघाडीतर्फे विद्यमान नगरसेवक सचिन दोडके यांना उमेदवारी दिली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)