निवडणूक काळात झाली बनावट मद्यविक्री

बारामतीच्या ग्रामीण भागात परवाने नसलेल्या ढाब्यांवरील प्रकार उघड

जळोची – विधानसभा निवडणुकीमुळे ग्रामीण भागात असलेली हॉटल आणि ढाब्यांवर दारूचा महापूर वाहत असला तरी अशा काही परवाना नसलेल्या ढाब्यांमधून बनावट मद्य विक्री केली गेल्याची चर्चा आता “श्रमपरिहार’ केलेले कार्यकर्तेच करू लागले आहेत. यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे बारामती पोलिसांनी कारवाई करीत निवडणुकीच्या कालावधीत 2 लाख 69 हजार रुपयांचा दारूसाठा जप्त करण्यात यश मिळवले आहे. यात देशा दारू, हातभट्टीची दारू याचाही समावेश असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

यासंदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, निवडणुकीच्या कालावधीत बारामती शहर सोडले तर बनावट मद्याची विक्री तालुक्‍याच्या ग्रामीण भागात अधिक प्रमाणात झाली असल्याचे समजते. ग्रामीण पोलिसांकडून असे मद्य पकडण्याकरिता विशेष मोहीमही राबविण्यात आली तरी निवडणुकीच्या कालावधीत याचे प्रमाण वाढल्याचे कार्यकर्त्यांचेच म्हणणे आहे.

बारामतीच्या ग्रामीण भागात मद्य विक्रीचे प्रमाण वाढले आहे. निवडणुकीच्या कालावधीत तर यामध्ये दुप्पट वाढ झाली. निवडणूक कालावधीत होणाऱ्या खास पार्ट्यांसाठी मद्याचा साठा अनेकांनी करून ठेवला होता. हीच संधी साधून विशिष्ठ ब्रॅंडच्या बनावट मद्याची विक्री केली गेली असल्याचे सांगितले जात आहे. ग्रामीण भगात विशेषत: महामार्ग, राज्यमार्गालगतच्या परवाना नसलेल्या ढाब्यांवर अशा प्रकारचे बनावट मद्य विक्री झाल्याची चर्चा आता जोरात आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका आर्थिक वर्षात ग्रामीण भागातून मद्य व्यवसायापोटी कोट्यवधींचा महसूल मिळतो. सध्या, बिअर शॉपीचे परवाने तर सहज मिळत असल्याने या व्यवसायांतून मिळणाऱ्या महसुलातही वाढ होत आहे. मद्य उद्योगावर कडक नियंत्रण ठेवले जात असल्यानेच महसुलात वाढ होत असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे म्हणणे आहे. मात्र, या उद्योगात बनावट मद्यनिर्मिती करणाऱ्यांनीही शिरकाव केला आहे. निवडणुकीच्या कालावधीत तर अशा बनावट कंपन्यांची उलाढाल वाढते.

आताच्या निवडणुकीच्या कालावधीतही अशा मद्याची विक्री मोठ्या प्रमाणात झाली असल्याचे चर्चा जोरात आहे. विशेषत: ग्रामीण भागात महामार्गालगत असलेल्या ढाब्यांतून विनापरवाना अशा प्रकारच्या बनावट मद्याची विक्री झाल्याचे सांगितले जाते.

बारामती तालुक्‍याच्या ग्रामीण भागात त्या-त्या स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या सर्वच हॉटेल, ढाब्यांची तपासणी करण्यात आलेली आहे. ज्यांच्याकडे मद्य विक्रीचे परवाने नाहीत, अशांवर कारवाई करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. सराईत गुन्हेगारांवरही कारवाई करण्यात आली आहे.
– नारायण पवार, पोलीस निरीक्षक, बारामती

 

Leave A Reply

Your email address will not be published.