चंदीगड – राज्याच्या दक्षता ब्युरोने पंजाबातील एका अधिकाऱ्यावर बेकायदेशीर कारवाई करून त्याला अटक केल्याचा आरोप करीत पंजाबातील नागरी सेवा अधिकाऱ्यांनी सोमवारपासून पाच दिवसांचे सामूहिक रजा आंदोलन सुरू केले आहे. (Punjab Civil Services officials have gone on public holiday ) पंजाब सिव्हिल सर्व्हिसेस ऑफिसर्स असोसिएशनने रविवारी या संदर्भात निर्णय घेतला.
लुधियानामध्ये प्रादेशिक परिवहन प्राधिकरण (आरटीए) म्हणून नियुक्त केलेले अधिकारी नरिंदर सिंग धालीवाल यांना शुक्रवारी दक्षता ब्युरोने वाहतूकदारांकडून लाच घेतल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. त्या अटकेवर नागरी सेवा अधिकाऱ्यांचा आक्षेप आहे. ही कारवाई बेकायदेशीर व मनमानी पद्धतीने केली गेली आहे असे त्यांचे म्हणणे आहे.
ही कारवाई रद्द करावी या मागणीसाठी राज्यातील सर्व अधिकाऱ्यांनी आजपासून पाच दिवसांचे सामूहिक रजा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. धालीवाल हे आयएएस अधिकारी आहेत.
दरम्यान, दक्षता ब्युरोने म्हटले आहे की, मुख्यमंत्र्यांच्या भ्रष्टाचार विरोधी हेल्पलाईनवर आलेल्या तक्रारीनुसार लुधियानात वाहतूकदारांकडून काही खासगी व्यक्तींमार्फत लाच गोळा केली जात असल्याचे आढळून आले होते.