पुणे – शहरातील नियमित मिळकतकर भरणाऱ्या करदात्यांवर महापालिकेकडून तब्बल दोन कोटींच्या बक्षिसांची खैरात केली जाणार आहे. महापालिका वेळेत मिळकतकर भरणाऱ्या करदात्यांना लकी ड्रॉद्वारे बक्षिसे देणार आहे. या वर्षीपासून ही योजना राबविण्यात येणार असून, त्यात, ई-कार, ई-बाईक तसेच इतर शेकडो बक्षिसांचा समावेश असणार आहे. महापालिकेकडून त्यासाठी ऑगस्ट महिन्यात हा लकी ड्रॉ काढला जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली. यासाठी अंदाजपत्रकात निधीची तरतूद करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, महापालिकेकडून यंदा 15 मे पासून नागरिकांना मिळकतकराची बिले दिली जाणार आहेत. तर नागरिकांना 15 मे ते 15 जुलैपर्यंत मिळकतकर भरल्यास त्यात सर्वसाधारण करात 5 ते 10 टक्के सवलत देण्यात येणार असून, या कालावधीत कर भरणारे मिळकतधारकच या लकी ड्रॉ साठी पात्र असणार आहेत.
महापालिकेकडून दरवर्षी मिळकतकराची बिले 1 एप्रिल पासूनच पाठविण्यात येतात तर 31 मे पर्यंत सवलतीत कर भरण्यास मुभा दिली जाते. मात्र, यंदा निवासी मिळकतींना देण्यात येणाऱ्या 40 टक्के सवलतीचा निर्णय शासनाकडे रखडल्याने बिले तयार करण्यात आलेली नव्हती. महापालिकेकडून 15 मे पासून देखभाल दुरूस्ती 15 वरून 10 टक्के करण्यात आलेल्या मिळकतधारकांना बिले दिली जाणार आहेत. 2019 पासून 40 टक्के सवलत रद्द केलेली तसेच पालिकेच्या जीआयएस सर्वेक्षणात 40 टक्के सवलत रद्द केलेल्या मिळकतींची बिले 31 मे पासून दिली जाणार आहेत.
महापालिकेस मिळणाऱ्या मिळकतकराच्या उत्पन्नातील 60 टक्के उत्पन्न पालिकेस आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यातच मिळते. त्यामुळे हे उत्पन्न अधिकाधिक वाढविण्याचा प्रशासनाचा मानस आहे. ही बाब लक्षात घेऊन ही बक्षिस योजना प्रस्तावित केली आहे. त्यामुळे, महापालिकेने दिलेल्या सवलतीच्या मुदतीत जे मिळकतधारक कर भरतील त्यांनाच या बक्षिस योजनेचा लाभ दिला जाईल. पुढील काही दिवसात ही बक्षिस योजना सविस्तर जाहीर केली जाईल.
– विक्रम कुमार, प्रशासक तथा महापालिका आयुक्त