केंद्रातून मदत मिळाली नाहीं तर केंद्रातील अर्थव्यवस्थेला राज्यातून हातभार नाही
नवी दिल्ली : करोनाच्या लॉकडाऊन मुळे राज्यांच्या अर्थव्यवस्थेवर मोठा ताण आला आहे. त्यांचे महसुली उत्पन्न बुडाले आहे. अशा स्थितीत केंद्र सरकारने पॅकेजच्या स्वरूपात राज्य सरकारांना आर्थिक मदत केली पाहिजे. अशी मदत केंद्र सरकारकडून मिळाली नाही तर राज्य सरकारे केंद्राच्या अर्थव्यवस्थेला हातभार लाऊ शकणार नाहीत असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारला पत्र पाठवून कळवले आहे.
या पत्रात पवारांनी अनेक महत्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की अमेरिका, जर्मनी, स्पेन, फ्रान्स आणि ऑस्ट्रेलियासह सर्वच देशांनी आपल्या जीडीपीच्या 10 टक्के आर्थिक मदत पॅकेजच्या स्वरूपात जाहींर केली आहेत. अशा प्रकारे आरबीआयसह केंद्र सरकारने राज्यांना पॅकेजेस जाहीर केली पाहिजेत. महाराष्ट्राच्या सन 20-21 च्या अर्थसंकल्पात 3 लाख 47 हजार कोटी रूपयांच्या महसुलाची अपेक्षा होती. सुधारीत अंदाजानुसार महसुलाची तूट 1 लाख 40 हजार कोटी रूपये इतकी होणार आहे.
अपेक्षित महसुलाच्या तुलनेत जमा महसुल केवळ चाळीस टक्के इतका असणार आहे. त्यामुळे राज्याच्या आर्थिक स्थितीत मोठी पोकळी निर्माण होणार आहे. महसुल तुटीची बाब लक्षात घेतली तर राज्य सरकारला खर्च भागवण्यासाठी किमान एक लाख कोटी रूपयांच्या तुटीचा सामना करावा लागणार आहे. कर्ज घेऊन ही गरज भागवता येऊ शकते पण तसे केले तर राज्य आणखी कर्जाच्या खाईत जाण्याचा धोका आहे असा इशाराहीं पवारांनी दिला आहे. राष्ट्रीय अल्प बचत कर्जाची महाराष्ट्र सरकार दरवर्षी साडे दहा हजार कोटी रूपयांची परतफेड करते. या परतफेडीला दोन वर्षांची मुभा द्यावी अशी सुचनाहीं त्यांनी केली आहे.
करोनामुळे शहरी अर्थव्यवस्थेला मोठा धोका पोहचला आहे. विमान वाहतूक, अन्य परिवहन आणि वाहतूक, अतिथ्य, मनोरंजन, माध्यमे, या सारख्या उद्योग क्षेत्रांना मोठा फटका बसला आहे. ही परिस्थिती नियंत्रणात आणणे कठीण आहे. अशा स्थितीमुळे पुन्हा अनेकांच्या नोकऱ्या जाणार आहेत. त्यांना पुन्हा रोजगार संधी देण्यासाठी पुन्हा जादा पैसे खर्च करावे लागणार आहेत त्यामुळे या साऱ्या स्थितीचा विचार करून केंद्राने राज्य सरकारला आर्थिक मदतीचे पॅकेज द्यावे अन्यथा केंद्रीय अर्थव्यवस्थेला हातभार लावणे राज्यांना शक्य होणार नाही याची विचार केंद्र सरकारने करायला हवा असेही त्यांनी या पत्रात म्हटले आहे.