न्हावरे : पुणे जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या वतीने शिरूर तालुक्यातील ६२५ दिव्यांग व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. अशी माहीती शिरूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बाळासाहेब ढवळे यांनी दैनिक “प्रभात” शी बोलताना दिली.
करोना महामारीमुळे जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींची गैरसोई होऊ नये म्हणून, जिल्हा परिषदेने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीकडून संपूर्ण किराणा व जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप अतिशय जलद गतीने करण्यात आले आहे.
त्यामुळे दिव्यांग व्यक्तींना जिल्हा परिषदेची मदत लवकरात लवकर मिळण्यास मदत झाली आहे. असे ढवळे यांनी सांगितले. प्रातिनिधिक स्वरूपात आलेगाव पागा(ता.शिरूर)येथे ग्रामसेवक एस.एस.सय्यद,पोलीस पाटील विशाल अवचिते यांच्या पुढाकाराने गावातील दिव्यांग व्यक्तींना जीवनावश्यक किटचे वाटप करण्यात आले.