श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये रविवारी आणखी 22 करोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. आता या केंद्र शासित प्रदेशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या 523 वर पोहोचली आहे. रविवारी आढळून आलेले सर्व नवीन रुग्ण हे काश्मीर खोऱ्यातील आहेत, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, जम्मू-काश्मीरमध्ये चोवीस तासांत 29 जणांचे करोना तपासणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. हे सर्व जण काश्मीर खोऱ्यातील रहिवाशी आहेत. जम्मू-काश्मीरमधील एकूण रुग्णांपैकी 466 रुग्ण हे काश्मीर, तर 57 रुग्ण हे जम्मूमधील आहेत. या आजारातून 177 रुग्ण बरे झाले असून सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
आतापर्यंत 66,343 प्रवासी आणि संशयित देखरेखी खाली असून यातील 8 जण हे शासकीय अधिकारी आहेत. तसेच 6 हजार 324 नागरिकांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर 233 जणांना रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. याशिवाय 48,000 लोकांनी त्यांचा पाळत ठेवण्याचा कालावधी पूर्ण केला आहे.