नवी सांगवीतील पवना नदीला गटारीचे स्वरूप

महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष; नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात

पिंपळे गुरव – नवी सांगवी येथील पवना नदीत गेल्या अनेक दिवसांपासून मैलामिश्रित पाणी सोडले जात असल्यामळे शहराच्या जीवनदायिनीला सध्या गटारीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे नागरिकांत संताप व्यक्त होत असून पुन्हा एकदा नागरिकांच्या आरोग्याचा ऐरणीवर आला आहे. महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष देऊन नागरिकांनी शुद्ध पाण्याची देण्याची मागणी होत आहे.

या परिसरात अहिल्याबाई होळकर दशक्रिया घाट आहे. या घाटाजवळ नदीपात्रात वारंवार चेंबर दुरुस्तीचे काम सुरू आहे. पावसाळ्यात देखील चेंबरचे काम होत असल्याची चर्चा नागरिकांमधून सुरू आहे. निगडी, रावेत, चिंचवड, पिंपरी, पिंळे सौदागर, पिंपळे गुरव, सांगवी, दापोडीहून पवना नदी पुढे मुळा नदीला जाऊन मिळते. शहरातून या नदीत कारखान्यातून तेलयुक्त पाणी व मैलामिश्रित पाणी नदीपात्रात सोडले जात आहे.

गेल्या पंधरा दिवसापासून हा प्रकार सुरु आहे. नदीत असणाऱ्या जलचर प्राण्याला देखील या मैलामिश्रित पाण्याचा धोका निर्माण झाला आहे. एकीकडे आपण शहर स्वच्छ व नदीला आईचा दर्जा देतो. नदीचा परिसर स्वच्छ ठेवा असा फलक लावतो. जाळी बसवतो आणि आपणच नदी घाण करतो. सध्या नदीपात्रात घाण पाणी मिसळल्याने दुर्गंधी सुटली आहे. याकडे पालिका प्रशासन गांभिर्याने लक्ष घालून त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून वारंवार नदीपात्रात चेंबर दुरुस्तीचे काम सुरू आहे. नागरिकांच्या पैशाची उधळपट्टी सुरू आहे. महापालिकेचा हा अजब कारभार आहे. काही ठिकाणी काम केले असून केलेले काम हे निकृष्ट दर्जाचे झाले आहे. अशी ओरड नागरिकांमधून सुरु आहे. तसेच ठेकेदारांना पोसण्याचे काम मनपा करत आहे. यात प्रशासनाचा हलगर्जीपणा दिसून येत आहे, अशी प्रतिक्रिया पर्यावरणप्रेमी राजू साळवे यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.