पुणे – शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासह अतिक्रमणे, रस्त्यांची दुरवस्था रोखण्यासाठी आता महापालिका प्रमुख 15 रस्त्यांसाठी “रोड मार्शल’ नेमणार आहे. वाहतूक पोलीस, अतिक्रमण निरीक्षक, महापालिकेचा सुरक्षारक्षक तसेच तातडीच्या कामांसाठी मदतनीस (बिगारी) यांचा यात समावेश असेल. तसेच या पथकाला स्वतंत्र वाहन दिले जाणार असून, संपूर्ण दिवसभर त्यांनी नेमून दिलेल्या रस्त्यावर वर्दळीच्या वेळी गस्त आणि प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची जबाबदार असले. शहरात असे 15 रस्ते “आदर्श’ करण्यात येणार आहेत. त्यात या मार्शल्सची भूमिका महत्त्वाची राहणार आहे.
शहरात अतिक्रमणे, सिग्नल यंत्रणा बंद पडणे, रस्त्यांवर वाहने बंद पडणे, रस्त्यांवर वर्दळीच्या ठिकाणी फ्लेक्स लावणे, रस्त्यावर वाहने लावून व्यवसाय करणे अशा कारणांमुळे ही स्थिती उद्भवते. बऱ्याचदा घाई असल्याने नागरिक तक्रार न करता निघून जातात. त्यानंतर कोणी तक्रार केली, अथवा माध्यमात वृत्त आले, तरच प्रशासनाला संबंधित रस्त्यावरील समस्या लक्षात येते. हे पथक वारंवार फिरत असल्याने अतिक्रमणे रोखणेही शक्य होणार आहे. रस्त्यांची दुरवस्था झाल्याचे आढळल्यास तातडीने दुरुस्ती करता येणार आहे. दरम्यान, नगर रस्ता आणि सोलापूर रस्त्यावर पुढील आठवड्यापासून प्रायोगिक तत्वावर ही योजना राबवली जाणार आहे.
या रस्त्यांवर असतील मार्शल
नगर रस्ता, सोलापूर रस्ता, मगरपट्टा रस्ता, पाषाण रस्ता, बाणेर रस्ता, संगमवाडी रस्ता, विमानतळ (व्हीआयपी) रस्ता, कर्वे रस्ता, पौड रस्ता, सातारा रस्ता, सिंहगड रस्ता, बिबवेवाडी रस्ता, नॉर्थ मेन रस्ता, गणेशखिंड रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता-बाजीराव रस्ता
प्रमुख रस्त्यांवर वर्दळ असते. तेथे हे रोड मार्शल नेमले जाणार आहे. तेथील अडचणी सोडविणे तसेच अतिक्रमणे, अनधिकृत फ्लेक्स, अनधिकृत पार्किंग यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी असणार आहे. पुढील काही दिवसांत 15 रस्त्यांसाठी ही 15 पथके असतील. त्यांच्यासाठी स्वतंत्र वाहन व्यवस्था असेल. – विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, मनपा