मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जोरदार टीका केली आहे. शिवसेनेला अयोध्येत जाऊन रामाशी नातं आहे, हे दाखवावे लागते.
मात्र, आमची छाती फाडली तरी रामच दिसेल, असे वक्तव्य करत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना अप्रत्यक्ष टोला लगाविला. चंद्रकांत पाटील म्हणाले, शिवसेनेला अयोध्येत जाऊन रामाशी नातं आहे, हे दाखवावे लागते. मात्र, आमची छाती फाडली तरी रामच दिसेल. 1925 सालापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हिंदू राष्ट्राची सांस्कृतिक संकल्पना मांडली आहे.
हा सांस्कृतिक राष्ट्रवाद उद्धवजींना आधीपासून मान्य होता. आता कॉंग्रेसलाही मान्य झाला असेल तर फारच चांगलं आहे, असा टोलाही त्यांनी कॉंग्रेसला लगावला. याची देही याची डोळा आम्हाला हिंदू राष्ट्रवाद साकार झाल्याचे पाहायला मिळत असल्याचेही ते म्हणाले.
दरम्यान, प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येत गेलेल्या उद्धव ठाकरेंनी हिंदुत्त्वावरुन भाजपवर टीकेचा बाण सोडला. भाजप म्हणजे हिंदुत्त्व नाही, शिवसेना भाजपपासून दूर गेली, मात्र हिंदुत्त्वापासून दूर गेलेली नाही. अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपचा समाचार घेतला होता. याला त्यांनी प्रत्युत्तर दिलं.