पुणे – लॉकडाऊनमुळे गेल्या दीड महिन्यांपासून बंद असलेली पासपोर्ट सेवा ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्येच सुरू होत आहे. मात्र, रेड झोनमध्ये पूर्णपणे पासपोर्ट सेवा बंदच राहणार आहे. त्यामुळे पुणेकरांना अजूनही काही दिवस अपॉईंटमेंटसाठी वाट पाहावी लागणार आहे.
लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर पासपोर्ट अपॉईंटमेंटही थांबवल्या होत्या. किंबहुना देशभरातील पासपोर्ट ऑफीसेस बंद ठेवण्यात आली. केंद्र सरकारने दिलेल्या सूचनांनुसार परराष्ट्र मंत्रालयाच्या वेबसाइटवर 17 मेपर्यंत रेड झोनमधील पासपोर्ट सेवा बंद राहणार असल्याचे म्हटले आहे. 17 मेनंतर रेड झोनबाबत होणाऱ्या निर्णयावरच नागरिकांना पासपोर्टसाठीच्या अपॉईंटमेंटसाठी ऑनलाइन अर्ज करायचा की नाही हे स्पष्ट करण्यात येईल. दरम्यान, पुणे विभागाचे मुख्य पासपोर्ट अधिकारी अनंत ताकवाले म्हणाले, पुणे विभागांतर्गत येणारी ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील पोस्ट ऑफीस पासपोर्ट सेवा केंद्र गुरुवारपासून सुरू करण्यात येतील. परंतु, रेड झोनमधील कार्यालये सुरू होणार नाहीत.