मुंबई – घाटकोपर येथे बेकायदा होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळून सोमवारी झालेल्या भीषण दुर्घटनेतील मृतांचा आकड्यात आता वाढ होऊन तो 14 जणांवर पोचला आहे. तर या घटनेत 75 हून अधिक जण जखमी झाले आहेत.
त्याचबरोबर 78 हून अधिकांना वाचवण्यात यश आले आहे. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून तिघा- चौघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
सोमवार 13 मे रोजी दुपारी 3 वाजता मुंबईत हवामानात अचानक बदल झाला. वादळानंतर पावसाला सुरुवात झाली. अचानक सुटलेल्या वादळामुळे घाटकोपरमधील पेट्रोल पंपावर 120 फुटांचे होर्डिंग कोसळले.
त्यामध्ये 100 हून अधिक जण अडकल्याची माहिती होती. तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले होते. हे बचावकार्य रात्रभर सुरू होते. मात्र आज सकाळी मृतांचा आकडा वाढला आहे.
हे होर्डिंग भावेश भिंडे नामक व्यक्तीच्या कंपनीचे होते. भिंडे सध्या बेपत्ता आहेत. पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत. पोलिसांनी या प्रकरणी भावेश भिंडे यांच्यासह अन्य काही जणांवर भादंवि कलम 304 338, 337 व 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, हे होर्डिंग इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड नामक कंपनीने लावले होते. भावेश भिंडे या कंपनीचे संचालक आहेत. त्यामुळे त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विभागीय पोलिसि उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी ही माहिती दिली आहे.
होर्डिंग कोसळण्याच्या घटनेनंतर मुंबई पोलिस सोमवारी रात्री भावेश भिंडे यांच्या मुंलुंड येथील घरी पोहोचले. पण भावेश किंवा त्याचे कुटुंब तिथे सापडले नाही. त्यानंतर त्यांनी त्याच्या मोबाइलवर संपर्क साधला असता मोबाइल बंद असल्याचे निष्पन्न झाले.
मुंबई महापालिकेने काही दिवसांपूर्वीच इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला बेकायदा होर्डिंग काढण्यासंबंधीची नोटीस बजावली होती. कंपनीने आपले 8 बेकायदा होर्डिंग पुढील 10 दिवसांत काढले नाही तर कंपनीचा शहरातील 24 वॉर्डांत होर्डिंग लावण्याचा परवाना रद्द केला जाईल, असा इशारा महापालिकेने या प्रकरणी दिला होता. पण कंपनीने त्याकडे साफ दुर्लक्ष केले होते. आता या कंपनीच्या होर्डिंगमुळेच 14 जणांचा बळी गेल्यामुळे मोठा वाद उत्पन्न झाला आहे.
होर्डिंगची लिम्का बुकमध्ये नोंद
उल्लेखनीय बाब म्हणजे, बीएमसीच्या निवेदनानुसार पंत नगर येथील ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील पेट्रोल पंपावर असलेले हे होर्डिंग अनधिकृत होते. यासाठी महापालिकेने परवानगी दिली नव्हती. हे होर्डिंग सुमारे 17,040 चौरस फूट मोठे असून त्याची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सर्वात मोठे होर्डिंग म्हणूनही नोंद करण्यात आली होती.
भाजपने जोडला ठाकरेंशी संबंध
भाजप आमदार राम कदम यांनी भावेश भिंडे याचा उद्धव ठाकरे यांच्याशी संबंध जोडला आहे. त्यांनी भावेश भिंडे व उद्धव ठाकरे यांचा एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोवरून दुर्घटनाग्रस्त होर्डिंगला कुणाचे संरक्षण होते हे स्पष्ट होते, असे ते म्हणाले आहेत.