नवी दिल्ली – भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी शनिवारी पक्षाच्या केंद्रीय पदाधिकाऱ्यांच्या यादीत फेरबदल करीत काही नवीन नियुक्त्या आणि फेरनियुक्त्या केल्या आहेत. यावेळी उत्तर प्रदेशातील पसमंदा मुस्लीम प्रतिनिधी तारिक मन्सूर यांची पक्षाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते उत्तर प्रदेशातील अलिगढ मुस्लीम विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत आणि तेलंगणा युनिटचे माजी प्रमुख बंदी संजय कुमार यांना राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
भारतीय जनता पक्षाने कर्नाटकातील नेते सी. टी. रवी, आसामचे लोकसभा खासदार दिलीप सैकिया यांना सरचिटणीसपदावरून वगळले आहे. तर खासदार विनोद सोनकर, खासदार हरीश द्विवेदी आणि सुनील देवधर यांना चिटणीस पदावरून वगळण्यात आले आहे. छत्तीसगडच्या राज्यसभा खासदार सरोज पांडे यांना उपाध्यक्ष करण्यात आले आहे, तर पश्चिम बंगालचे लोकसभेचे खासदार दिलीप घोष यांना या पदावरून वगळण्यात आले आहे.
छत्तीसगडमधील आदिवासी नेत्या लता उसेंडी यांनाही उपाध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले आहे. छत्तीसगडमध्ये लवकरच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर छत्तीसगडला हे प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. उत्तर प्रदेशचे राज्यसभा खासदार राधामोहन अग्रवाल यांनाही पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस करण्यात आले आहे. अन्य सात राष्ट्रीय सरचिटणिसांना कायम ठेवण्यात आले आहे.
कॉंग्रेसचे नेते ए. के.अँटोनी यांचा मुलगा अनिल अँटोनी, सुरेंद्र सिंग नागर आणि कामाख्या प्रसाद तासा यांची सेक्रेटरीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.पक्षाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या यादीत 13 उपाध्यक्ष, नऊ सरचिटणीस आणि तेरा सेक्रटरीचा समावेश आहे.नवीन राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या यादीत पाच महिला उपाध्यक्ष आणि चार महिला सचिवांचा समावेश असला तरी पक्षाच्या नऊ सरचिटणीसांमध्ये एकही महिला नाही. माजी मुख्यमंत्री रमण सिंह, वसुंधराराजे आणि रघुबर दास हे नवीन यादीत उपाध्यक्ष म्हणून कायम ठेवण्यात आले आहेत. अरुण सिंग, कैलाश विजयवर्गीय, दुष्यंत कुमार गौतम, तरुण चुघ, सुनील बन्सल आणि विनोद तावडे यांची सरचिटणीसपदे कायम ठेवण्यात आली आहेत.