लखनौ: मुस्लिमांकडून भाजी खरेदी करू नका, असे जाहीर आवाहन करणारे उत्तरप्रदेशातील भाजपचे आमदार सुरेश तिवारी आणि उत्तरप्रदेशातील सरकारी दवाखान्यांतील खरेदीत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करणारे पक्षाचे आमदार शाम प्रकाश यांच्यावर भारतीय जनता पक्षाने काल कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे.
पक्षाच्या या आमदारांची ही विधाने पक्ष शिस्तीचा भंग करणारी आहेत, त्यामुळे त्यांनी यावर खुलासा करावा, अशा नोटीसा त्यांना धाडण्यात आल्याची माहिती उत्तरप्रदेश भाजपचे माध्यम प्रमुख मनिष दीक्षित यांनी दिली. या दोन्ही आमदारांची ही विधाने बेजबाबदारपणाची असून पक्षाध्यक्ष जे. पी. नढ्ढा यांनीही त्यांचे कान उपटले आहेत असेही दीक्षित यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे. पक्षाच्या कोणत्याही लोकप्रतिनिधींनी अशी बेजबाबदार विधाने करू नयेत, ही बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही असा इशाराहीं नढ्ढा यांनी संबंधीतांना दिला आहे.
तिवारी आणि प्रकाश हे दोन्ही आमदार हरदोई जिल्ह्यातील आमदार आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याचा आदेश पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने प्रदेश अध्यक्षांना दिला आहे. मुस्लिमांकडून काहीही खरेदी करू नका, त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाका असे विधान आमदार तिवारी यांनी एका व्हिडिओ संदेशात केले होते. त्यावर वाद सुरू झाल्यानंतरही त्यांनी आपल्या विधानांचे समर्थन केले होते. दुसरे आमदार सत्यपाल मलिक यांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात जी वैद्यकीय उपकरणांची खरेदी केली जात आहे त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत त्यांनी आपल्या जिल्ह्यातील काही उदाहरणे दिली होती.