पूरग्रस्त 26 कुटुंबांना पालिका देणार घरे

पुणे – आंबील ओढ्याला सप्टेंबर महिन्यात आलेल्या पुरात बेघर झालेल्या आंबिल ओढा भागातील 26 कुटुंबांच्या पुनर्वसनास स्थायी समितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. ही कुटुंबे गेल्या एक महिन्यापासून बेघर असून त्यांच्या पुनर्वसनाची तातडीची मागणी करण्यात येत होती. मात्र, हे पुनर्वसन तात्पुरत्या स्वरूपाचे असणार असून लवकरच त्यांना “एसआरए’ योजनेत घर देण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे यांनी स्पष्ट केले.

शहरात सप्टेंबर महिन्यांत झालेल्या पावसात आंबील ओढ्याच्या परिसरातील अनेक भागांतील घरांत पाणी शिरले तर, काही जणांची घरेच वाहून गेली आहे. त्यात आंबिल ओढा परिसरातील 26 घरे पूर्णपणे वाहून गेली आहेत. त्यामुळे या कुटुंबांना नव्या पेठेतील महापालिकेच्या शाळेत ठेवण्यात आले आहे. त्यांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय रेंगाळल्याने गेल्या दोन महिन्यांपासून 26 कुटुंब शाळेतच राहात आहेत. त्यातच आता शाळाही सुरू झाल्याने पूरग्रस्तांची गैरसोय होत आहे.

दरम्यान, पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया महापालिका प्रशासन करीत आहे. परंतु, सध्याची अडचण लक्षात घेऊन 26 कुटुंबांचे तात्पुरते पुनर्वसन करण्यात येईल, असे स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

स्मारकासाठी 20 कोटींचे वर्गीकरण
बुधवारी झालेल्या बैठकीत संगमवाडी येथील आद्यक्रांतिवीर वस्ताद लहुजी साळवे यांच्या नियोजित स्मारकाच्या भूसंपादनासाठी 20 कोटी रुपयांच्या वर्गीकरणासही मान्यता देण्यात आली आहे. या स्मारकाच्या भूसंपादनासाठी पालिकेने या पूर्वीच जिल्हा प्रशासनाकडे 30 कोटींचा निधी वर्ग केला आहे. त्यानंतरही जिल्हा प्रशासनाकडून निधीची मागणी करण्यात आली असल्याने तातडीने ही तरतूद उपलब्ध करून देण्यात आल्याचे स्थायी समिती अध्यक्ष सुनील कांबळे यांनी स्पष्ट केले. नगरसेवक हेमंत रासणे आणि राजेंद्र शिळीमकर यांनी याबाबतचा प्रस्ताव दिला होता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.