सातारा – सातारा शहरात जेली चॉकलेट घशात अडकून एक वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. शर्वरी सुधीर जाधव (रा. कर्मवीर नगर कोडोली) असे मृत चिमुकलीचे नाव आहे. ही घटना रविवारी रात्री नऊच्या सुमारास घडली शर्वरीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेले. मात्र, त्यापूर्वीच तिने आपला जीव गमावला होता.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, चिमुकल्या शर्वरीला तिच्या शेजारी राहणाऱ्या एका लहान मुलीने जेली चॉकलेट खाण्यास दिले. हे चॉकलेट तिने स्वतः गिळले परंतु चॉकलेट तिच्या घशात अडकल्याने ती खोकू लागली आणि नंतर बेशुद्ध पडली. तिच्या आईच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी घराशेजारी राहणाऱ्या देवबा जाधव यांना बोलावून घेतले. त्यांनी शर्वरीला जिल्हा प्रशासकीय रुग्णालयात दाखल केले.
डॉक्टरांनी तिची तपासणी केली असती मृत झाल्याचे त्यांनी जाहीर केले. घशात चॉकलेट अडकून मुलीचा मृत्यू झाल्याने तिच्या आईने यावेळी केला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. चिमुकलीच्या अशा प्रकारे मृत्यूचा कुटुंबियांना धक्का बसला असून या दुर्देवी घटनेने कोडोली परिसरात हळहळ व्यक्त होत असून सातारा शहर पोलीस ठाण्यात वैद्यकीय अधिकारी एस. डी. साळुंखे यांनी फिर्यादी दिली.