अहमदाबाद – गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पंतप्रधाननरेंद्र मोदीही आता गुजरातमध्ये सभा घेणार आहेत. विशेष म्हणजे आपल्या गुजरात भेटीत ते राज्यातील पापा नी परी या लग्न उत्सवात सहभागी होणार आहेत.
हा लग्न उत्सव म्हणजे एक सामूहिक विवाह सोहळा आहे. यात अनाथ झालेल्या पाचशे मुलींचा विवाह लावला जाणार आहे. त्याचे आयोजक आणि अन्य तपशील अद्याप समोर आला नसला तरी मोदी या सोहळ्याला भेट देऊन नववधुंना आशीर्वाद देणार असल्याची माहिती दिली जाते आहे.
मोदी उद्याच म्हणजे रविवारी गुजरातला जाणार आहेत. दक्षिण गुजरात आणि सौराष्ट्र या भागाला ते भेट देणार असून तेथे त्यांच्या सभांचे आयोजनही करण्यात आले आहे. मात्र या विवाह सोहळ्याचे स्थळ आणि वेळ याचा तपशील देण्यात आलेला नाही.