नवी दिल्ली – दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेले हवा प्रदुषण अजूनही कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. शनिवारी दिल्लीवर धुक्याचा जाड थर कायम राहिला, येथील हवेची गुणवत्ता एअर क्वालिटी इंडेक्सवर “गंभीर” श्रेणीत राहिली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दिल्लीत 37 िंठकाणी केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाने हवेच्या चाचणीसाठी मॉनिटरिंग स्टेशन्स उभारली आहेत. त्यापैकी 24 ठिकाणच्या नोंदीनुसार तेथील हवा प्रदुषण पातळी गंभीर श्रेणीमध्ये नोंदवली गेली आहे.
तथापि, ज्या भागात किंचित सुधारणा झाली त्या भागात आनंद विहार (394), मथुरा रोड (381), दिलशाद गार्डन (278), , लोधी रोड (371), पंजाबी बाग (357) या परिसरांचा समावेश होतो. एअर क्वालिटी इंडेक्स जर चारशेच्यावर नोंदवला गेला असेल तर ती स्थिती गंभीर मानली जाते. दिल्लीतील सरासरी एअर क्वालिटी इंडेक्स 408 वर नोंदवला गेला आहे.
अलीपूर (434), अशोक विहार (425), बवाना (450), जहांगीरपुरी (444), मुंडका (434), नरेला (452), नेहरू नगर (422), पटपरगंज (420), रोहिणी (420), सोनिया विहार (446), विवेक विहार (426) आणि वजीरपूर (432) या भागातील हवेची स्थितीही गंभीर आहे. दिल्लीत इलेक्ट्रिक आणि सीएनजीशिवाय इतर ट्रकच्या प्रवेशावरही बंदी घालण्यात आली आहे. डिझेलवर चालणाऱ्या मोटारकारवरही निर्बंध लागू आहेत. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्यां मालवाहू गाड्यांना मात्र या निर्बंधातून सूट देण्यात आली आहे.