पुणे – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्यांपैकी एक असलेले पानशेत धरण 100 टक्के भरले आहे. पानशेत धरणातून पॉवरहाऊसमधून 600 क्युसेक, तर धरणाचे दरवाजे उघडून नदीत 3 हजार 580 क्युसेक असे एकूण 4 हजार 180 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. दरम्यान, खडकवासला प्रकल्पात 94 टक्के म्हणजे 27.20 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे पुणेकरांच्या पिण्याच्या पाण्याचा वर्षभराचा प्रश्न मिटला आहे.
खडकवासला, पानशेत ही धरण पूर्ण क्षमतेने भरली आहेत. आता वरसगाव धरणही भरण्याच्या मार्गावर आहे. वरसगाव धरणात 11.61 टीएमसी म्हणजे 91 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. खडकवासला धरणात 1.94 टीएमसी पाणीसाठा आहे. तसेच धरणातून कालव्याद्वारे 1 हजार 155 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. टेमघर धरण 3 टीएमसी इतके भरले असून धरणात 81 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.