पुणे,{प्रभात वृत्तसेवा} – श्रीराम जय राम जय जय राम, सियावर रामचंद्र की जय आणि जय श्रीरामचा गजर, रामनामाचे कीर्तन, सुवासिनींनी म्हटलेला रामजन्माचा पाळणा अशा पारंपरिक उत्साहात बुधवारी शहरातील सर्व मंदिरांमध्ये रामनवमी साजरी करण्यात आली. महाराष्ट्राचे वाल्मिकी गदिमा आणि संगीतकार-गायक सुधीर फडके यांच्या कलाविष्काराचा अलौकिक संगम असलेल्या अजरामर गीतरामायणाचे स्वर प्रत्येक मंदिरात ऐकू येत होते.
रामनवमीनिमित्त शहरातील राम मंदिरांशिवाय अन्यही देवतांची मंदिरे सजवण्यात आली होती. याठिकाणीही राम जन्मसोहळा साजरा करण्यात आला. अयोध्येत रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केल्यानंतर असाच सोहळा संपूर्ण देशात साजरा झाला होता. त्यानंतर झालेला हा राम जन्माचा सोहळा विशेष आहे.
पेशवेकालीन तुळशीबाग राम मंदिरामध्ये फुलांनी सजलेल्या मंदिराच्या सभामंडपात २६३ वा श्रीराम जन्मसोहळा थाटात साजरा झाला. श्री रामजी संस्थानच्या वतीने सकाळी श्रीरामाची मुख्य पूजा पार पडली. मंदिर परिसरात श्रीरामांच्या पोषाखाची मिरवणूक काढण्यात आली. दर्शनबुवा वझे यांचे श्रीराम जन्माचे कीर्तन झाले. त्यानंतर मुख्य सोहळा दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी झाला.
श्रीराम जन्मानंतर मिळणारा श्रीरामाच्या वस्त्राचा पागोट्याचा प्रसाद घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली, तर सायंकाळी श्रीरामांच्या छबिन्याची मिरवणूक काढण्यात आली. पुणेकरांनी चौकाचौकांत पुष्पवृष्टीने मिरवणुकीचे स्वागत केले. संस्थानचे कार्यकारी विश्वस्त सुहास तुळशीबागवाले यंदाच्या उत्सवाचे सालकरी आहेत. सायंकाळी मंदिर परिसरात श्रीरामांच्या छबिन्याची मिरवणूक काढण्यात आली.
साईनाथ मंडळ ट्रस्टच्या वतीने शोभना कुर्तकोटी यांचे कीर्तन झाल्यानंतर रामजन्माचा पाळणा म्हणून साईबाबांची आरती करण्यात आली. ज्येष्ठ संगीतकार-गायक श्रीधर फडके आणि तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांच्या हस्ते प्रसिद्ध संगीतकार- गायक डाॅ. सलील कुलकर्णी यांना साई पुरस्कार प्रदान करण्यात आला. मंडळाचे अध्यक्ष पीयूष शहा आणि कार्यकर्त्यांनी उत्सवाचे आयोजन केले होते.
मुकुंदनगर येथील दौलतराम मंदिरामध्ये शशिकला देशपांडे यांचे भक्तिसंगीत, श्री रामजन्मोत्सव सोहळा झाल्यानंतर सायंकाळी श्री रामजानकी यांच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. श्रीधर फडके यांच्या गीतरामायणाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. शनिवार पेठ येथील जोशी श्रीराम मंदिरामध्ये पारंपरिक पद्धतीने रामनवमी साजरी करण्यात आली. शेखर व्यास यांचे रामजन्माचे कीर्तन झाल्यानंतर पाळणा म्हणून रामजन्म झाला.
नारायण पेठेतील भाजीराम मंदिर, सदाशिव पेठेतील पुणे विद्यार्थी गृहाच्या आवारातील धनुर्धारी राम मंदिर आणि रहाळकर राम मंदिर, गाडगीळ राम मंदिर, सदावर्ते राम मंदिर, तपकीर गल्ली येथील हरभरे राम मंदिर, लक्ष्मी रस्त्यावरील लिकिते राम मंदिर यांसह शहरातील विविध मंदिरांमध्ये पारंपरिक पद्धतीने रामनवमी उत्सव साजरा करण्यात आला.
या पेठांमधील मंदिरांशिवाय उपनगरांमध्ये असलेल्या मंदिरांमध्येही रामजन्माचा उत्सव साजरा झाला. काही मंदिरांमध्ये रामजन्म झाल्यानंतर सुंठवडा, भोजन आणि महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
उमेदवारांचे देवदर्शन आणि प्रचार
रामनवमीनिमित्त दर्शनासाठी मोठ्या संख्येने आलेल्या भाविकांना भेटण्याची संधी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांनी दवडली नाही. तुळशीबाग मंदिरामध्ये रामजन्माचे कीर्तन सुरू असताना महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर सपत्नीक दर्शनासाठी आले होते. दोघांनीही स्वार्थ आणि परमार्थ साधल्याची चर्चा उपस्थितांत रंगली होती.