पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुण्यातील वानवडी भागात काम करणाऱ्या स्वच्छ कचरावेचक ज्योती पंडित यांची मुलगी श्वेता पंडित हिची भारतीय नौदलात निवड झाली आहे. ती चिलका, ओरिसा येथे प्रशिक्षणासाठी रवाना झाली आहे. खडतर परिस्थितीत, अथक परिश्रमातून श्वेताने आपल्या यशातून एका अविश्वसनीय बदलाचा प्रवास जगासमोर आणला आहे.
श्वेताने शाळेत राष्ट्रीय कॅडेट कोरमध्ये सहभाग घेतला. इयत्ता बारावीख्शस परीक्षेत तिने ७८% मार्क मिळवले. मिलिटरी नर्सिंग सर्विस, पोलिस भरती अशा परीक्षांमध्ये आलेल्या अपयशाने खचून न जाता तिने आपली तयारी सुरू ठेवली. दररोज १० तास अभ्यास, खडतर शारिरीक व्यायाम करत तिने नौदल परीक्षेची तयारी केली. शारीरिक तंदुरुस्ती, आरोग्य परीक्षा आणि लेखी परीक्षा या तिन्हीमध्ये उत्तम कामगिरी केली.
४०० मुलींमधून श्वेताच्या चांगल्या कामगिरीमुळे तिची भारतीय नौदलात निवड झाली. आपल्या यशाचे श्रेय तिने तिची आई, स्वच्छ पुणे सेवा सहकारी संस्था आणि कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत यांना दिले आहे.
स्वच्छ संस्थेच्या माध्यमातून कचरा वेचकांच्या मुलांच्या युवा गटांद्वारे जी जडणघडण झाली, आपले करियर, स्वप्न पूर्ण करण्यासाठी जे प्रोत्साहन मिळाले त्याचा आपल्या यशात मोठा वाटा आहे. आईच्या कचरा संकलनाच्या कामाची किंमत मी जाणते आणि तिच्या कधीही हार न मानण्याचा स्वभाव बघत मी मोठी झाले.- श्वेता पंडित, नौदल कॅडेट
मला आई म्हणून माझ्या मुलीचा खूप अभिमान वाटतो. मी २०१३ पासून स्वच्छ संस्थेची सभासद आहे आणि वानवडी गावात दारोदार कचरा संकलनाचे काम करते. आपल्या देशासाठीच सेवा करावी अशी श्वेताची मनापासून इच्छा होती. तिच्या झोकून देऊन परीक्षेची तयारी करण्याच्या प्रवासाची मी साक्षीदार आहे आणि तो प्रवास आठवून माझे डोळे पाणावतात. – ज्योती पंडित, श्वेताची आई