संयुक्तराष्ट्रे – गेल्या एक आठवड्यात भारतातील करोना रुग्णांच्या संख्येत तेरा टक्के घट झाली आहे पण तरीही भारतातील सध्याचे करोना रुग्णांचे प्रमाण जगातील सर्वाधिक आहे असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने करोनाचा साप्ताहिक अहवाल प्रकाशित केला असून त्यात त्यांनी ही माहिती दिली आहे. आठवडाभरात जगात करोनाच्या 48 लाख केसेस आढळून आल्या असून 86 हजार लोकांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
आठवडाभरात भारतात 23 लाख 87 हजार 663 नवीन केसेस आढळून आल्या आहेत हे प्रमाण मागील आठवड्यापेक्षा तेरा टक्क्यांनी कमी आहे परंतु एकूण संख्या मात्र अद्यापही जगातील सर्वाधिक संख्या आहे असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
भारताच्या खालोखाल कोविड रुग्णांच्या बाबतीत या आठवड्यात ब्राझील, अमेरिका, अर्जेंटिना आणि कोलंबिया या प्रांतांचे क्रमांक लागतात. तथापि, अमेरिकेतील प्रमाण 21 टक्क्यांनी घटले असून ब्राझील आणि अर्जेंटिनाचे प्रमाण अनुक्रमे 3 टक्के आणि 8 टक्क्यांनी वाढले आहे.
या आठवड्याच्या कालावधीत भारतात सर्वाधिक म्हणजे 27 हजार 922 रुग्ण दगावले असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.