Pakistan – पाकिस्तान (Pakistan) जम्मू-काश्मीरमध्ये परदेशी दहशतवाद्यांना घुसवण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे, असे लष्कराच्या उत्तर विभागाचे प्रमुख कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी म्हटले आहे. एवढेच नव्हे तर आता पाकिस्तानातील निवृत्त लष्करी जवान दहशतवादी म्हणून कार्यरत केले जात आहेत असेही त्यांनी म्हटले आहे.
राजौरी जिल्ह्यातील धर्मसाल पट्ट्यातील बाजीमाल भागात झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या दोन कॅप्टनसह पाच लष्करी जवानांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले.
पत्रकारांशी बोलताना लेफ्टनंट जनरल द्विवेदी म्हणाले की, राजौरी आणि पूंछ या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये एका वर्षात दोन डझनहून अधिक परदेशी दहशतवाद्यांचा सफाया करण्यात आला आहे. राजौरीतील चकमकीत दोन विदेशी दहशतवादी ठार होणे हा पाकिस्तानच्या योजनांना देण्यात आलेला मोठा धक्का आहे असे ते म्हणाले.
द्विवेदी म्हणाले की “आम्ही जेव्हा दहशतवाद्यांची ओळख शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा आम्हाला कळले की त्यांच्यापैकी काही पाकिस्तानचे निवृत्त लष्करी जवान आहेत. पाकिस्तानाला जम्मू काश्मीरात आता स्थानिक समर्थक मिळेनासे झाले आहेत त्यामुळे ते विदेशी दहशतवादी भारतीय हद्दीत घुसवण्याच्या प्रयत्नांत आहेत. त्यांना निष्प्रभ करण्याचे आमचे प्रयत्न जारी आहेत असेही त्यांनी नमूद केले.