नवी दिल्ली – मध्यपूर्वेत प्रवास करत असताना अनेक नागरी विमाने काही वेळा, काही भागांवर दिशाहीन होत (Planes flying directionless) असल्याच्या वृत्तामुळे भारताने चिंता व्यक्त केली असून नागरी विमान वाहतूक नियामक प्राधिकरणाने सर्व भारतीय विमान कंपन्यांसाठी एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. अलिकडच्या काही दिवसांत असे अनेक अहवाल आले आहेत की नागरी विमाने मध्यपूर्वेतील काही भागांवरून उड्डाण करतात तेव्हा त्यांच्या नेव्हिगेशन सिस्टममध्ये गोंधळ निर्माण केला जातो आहे. (India promptly)
विमान वाहतुकीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा एक मोठा धोका गणला जात असल्याने त्यावर मात करणे ही तातडीची गरज असल्याचे डीजीसीएने म्हटले आहे. ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम जॅमिंग आणि स्पूफिंगच्या अहवालांमुळे विमान वाहतूक उद्योग सध्या अनिश्चिततेशी झुंजत आहे, असे डीजीसीएच्या परिपत्रकात म्हटले आहे. डीजीसीएने थ्रेट मॉनिटरिंग आणि ऍनालिसिस नेटवर्क तयार करण्याचीही मागणी केली आहे.
सप्टेंबरच्या उत्तरार्धात, इराणजवळील अनेक व्यावसायिक उड्डाणे त्यांच्या नेव्हिगेशन सिस्टीममध्ये त्रुटी आल्यानंतर बंद झाली. स्पूफिंगला बळी पडलेल्या विमानांपैकी एक विमान परवानगीशिवाय इराणच्या हवाई हद्दीत उड्डाण करत होते. व्यावसायिक वैमानिक, फ्लाइट डिस्पॅचर, शेड्युलर आणि कंट्रोलर्सच्या गटाने या समस्येला धोक्याचा इशारा मानले आहे.
मध्यपूर्वेतील काही भागांवरून उडणाऱ्या विमानांना सुरुवातीला खोटे जीपीएस सिग्नल मिळतात. या सिग्नलचा उद्देश विमानाच्या अंगभूत प्रणालीला फसवून ते त्यांच्या इच्छित मार्गापासून मैल दूर उड्डाण करत आहेत असा विचार करण्यात आहे. हा खोटा सिग्नल अनेकदा विमानाच्या प्रणालीच्या सॉफ्टवेरमध्ये गोंधळ करण्याइतका मजबूत असतो. याचा परिणाम असा होतो की काही मिनिटांत, इनर्शिअल रेफरन्स सिस्टीम अस्थिर होते आणि बऱ्याच प्रकरणांमध्ये, विमान सर्व नेव्हिगेशन क्षमता गमावते. असे प्रकार उत्तर इराक आणि अझरबैजानमधील व्यस्त वायुमार्ग येथे जास्त प्रमाणात असून एरबिलजवळ विमाने दिशाहीन होण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.