इस्लामाबाद – अरबी समुद्रात भारताचे एक मोठे जहाज बुडाले. या जहाजावर 10 क्रू मेंबर्स होते. त्यापैकी 9 जणांना वाचविण्यात यश आले असून एकचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. दरम्यान, पाकिस्तान नौदलाने 9 क्रू मेंबर्सना वाचवल्याचा दावा केला आहे.
अरबी समुद्रात भारताचे जहाज बुडाल्यानंतर आम्ही मदतीसाठी तात्काळ धाव घेतली, असे पाकिस्तान नौदलाकडून सांगण्यात आले आहे. पाकिस्तानी नौदलाच्या जनसंपर्क महासंचालकांनी सांगितले की, बलुचिस्तान प्रांतातील ग्वादर या तटीय शहराजवळ 9 ऑगस्ट रोजी भारतीय जहाज “जमना सागर’ बुडाल्याची घटना घडली. त्यात 10 क्रू मेंबर्स होते. त्यापैकी एकाचा मृतदेह नंतर बाहेर काढण्यात आला.
जो पाकिस्तान सागरी सुरक्षा एजन्सीकडे सोपवण्यात आला. पाकिस्तानच्या प्रादेशिक पाण्याचे क्षेत्र 12 नॉटिकल मैल आहे. 2015मध्ये त्याचा सागरी क्षेत्र (EEZ) 290,000 चौरस किलोमीटरपर्यंत वाढविण्यात आला आहे. त्यामुळे ही मदत करता आली.
आमच्या व्यापारी जहाजाने नऊ क्रू मेंबर्सची समुद्रातून सुखरुप सुटका केली आणि दुबईतील एका बंदरावर त्यांना सोडले, असेही निवेदनात म्हटले आहे. त्याचवेळी, दोन हेलिकॉप्टरसह पाकिस्तानी नौदलाचे जहाज देखील या भागात पोहोचले आणि मदतकार्य सुरु केले.