इस्लामाबाद – पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी देशातील करोना विषाणू संकटाशी सामाना करण्याकरिता तीन आंतरराष्ट्रीय वित्त संस्थांसोबत 150 कोटी डॉलर्सचे कर्ज घेण्याच्या करारावर स्वाक्षरी केली आहे.
इम्रान खान यांनी जागतिक बॅंक, आशियाई विकास बॅंक आणि आशियाई इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हल्पमेंट (एआयआयबी) बॅंक या तीन वित्त संस्थांसोबत करार केला आहे.
आरोग्य सेवेला भक्कम करण्यासाठी आणि महामारीचा प्रसार रोखण्यासाठी पाकिस्तान प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. यासाठी एआयआयबी 50 कोटी डॉलर्सचे कर्ज पाकिस्तानला देणार आहे. याप्रकारेच इतर दोन्ही वित्त संस्था प्रत्येकी 50 कोटी डॉलर्सचे कर्ज देणार आहे. पुढील काही दिवसांत 150 कोटी डॉलर्सची रक्कम पाकिस्तानला मिळणार आहे.
सध्या पाकिस्तानमध्ये करोना बाधितांच्या संख्येने पावणे दोन लाखाचा टप्पा गाठला आहे, तर साडेतीन हजारांपेक्षा जास्त करोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.